Sirish Subash : सिरीश सुभाष या १४ वर्षीय मुलाने जिंकली ‘अमेरिकेचा सर्वोच्च युवा शास्त्रज्ञ’ पदवी !
‘पेस्टिस्कँड’ या कीटकनाशक शोधकाचा लावला शोध !
जॉर्जिया (अमेरिका) – फळे, भाज्या इत्यादी उत्पादनांवरील कीटकनाशकांचे अवशेष शोधण्यासाठी हातात धरण्यास सोयीस्कर अशा ‘पेस्टिस्कँड’ नावाच्या उपकरणाचा शोध लावल्याने जॉर्जियाच्या स्नेलव्हिले येथील सिरीश सुभाष या ९व्या इयत्तेच्या विद्यार्थ्याने अमेरिकेची ‘३ एम् यंग सायंटिस्ट’ स्पर्धा जिंकली आहे. १४ वर्षीय सिरीशला २५ सहस्र डॉलर्स रोख आणि ‘अमेरिकेचा सर्वोच्च युवा शास्त्रज्ञ’ ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त झाली आहे.
बहुतेक संशोधकांप्रमाणेच सिरीश यालाही एका प्रश्नाचे कुतूहल होते. फळ खाण्यापूर्वी त्याने ते धुवावे असा आग्रह त्याच्या आईने नेहमीच धरला आणि या प्रतिबंधात्मक कृतीमुळे खरोखर काही लाभ होतो का, असा प्रश्न त्याला पडला. त्याने त्याचा अभ्यास केला आणि त्याला आढळून आले की, ७० टक्के उत्पादनांमध्ये कीटकनाशकांचे अवशेष असतात, जे कर्करोग आणि ‘अल्झायमर’ यांसारख्या संभाव्य आरोग्य समस्यांशी जोडलेले असतात. फळे धुतल्याने केवळ दूषिततेचा काही भाग काढला जातो. त्याने त्यावर संशोधन केले आणि फळे, भाज्या इत्यादींवरील कीटकनाशकांचे अवशेष शोधण्यासाठी एका नवीन उपकरणाचा शोध लावला.
संशोधन पुढे चालू ठेवून ‘पेस्टिस्कँड’चे उत्पादन करून ते बाजारात २० डॉलरपर्यंत आणण्याचा सिरीशचा मानस आहे. त्याला पुढे अमेरिकेतील प्रथितयश ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी’ या विद्यापिठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
असा केला अभ्यास !
१. सिरीशच्या ‘पेस्टिस्कँड’ नावाच्या उपकरणात ‘स्पेक्ट्रोफोटोमेट्री’चा वापर करण्यात आला आहे. यात फळे आणि भाज्या यांच्या पृष्ठभागावरील कीटकनाशकांकडून परावर्तित होणारा प्रकाश मोजणे समाविष्ट आहे.
२. सिरीशच्या प्रयोगांमध्ये त्याने सफरचंद, पालक, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो यांच्या तब्बल १२ सहस्रांहून अधिक नमुन्यांची चाचणी केली. वेगवेगळे कीटकनाशक प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबी (वेव्हलेंथ) प्रतिबिंबित करतात आणि शोषून घेतात.
३. ‘पेस्टिस्कँड’ कीटकनाशकांच्या अवशेषांशी संबंधित विशिष्ट तरंगलांबी शोधू शकते. ४. अन्न स्कॅन केल्यानंतर ‘पेस्टिस्कँड’ कीटकनाशकांची उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या लहरींचे विश्लेषण करण्यासाठी ‘एआय मशीन लर्निंग मॉडेल’ वापरते. यामुळे सिरीश ८५ टक्क्यांपेक्षा अधिक अचूकता दर शोधण्यात यशस्वी झाला.