व्यायाम करतांना स्वत:त झालेल्या सकारात्मक पालटांकडे लक्ष द्या आणि स्वतःला प्रोत्साहित करा !

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !

निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २२

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारांसह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.

‘बर्‍याचदा व्यायाम करतांना आपण ‘वजन न्यून होणे, पोटाचा घेर न्यून होणे’, इत्यादी मोठे पालट होण्याकडे लक्ष देतो; परंतु आपल्यात होणारे इतर अनेक लहान लहान पालट आपल्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे आपला व्यायाम करण्याचा उत्साह न्यून होऊ लागतो. आपल्यात होत असलेल्या अशा लहान पालटांकडे लक्ष देऊन त्यांचे अधूनमधून स्मरण केले, तर व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळत रहाते आणि व्यायामाची गुणवत्ताही वाढते. छोट्या; पण महत्त्वाच्या पालटांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/847820.html

१. स्नायूंच्या क्षमतेत सुधारणा होणे

पूर्वी १५ मिनिटे बसल्यावर पाठ दुखू लागणे; पण व्यायाम चालू केल्यापासून सलग १ घंटा बसणे शक्य होणे.

श्री. निमिष म्हात्रे

२. शरिराची लवचिकता वाढणे

पूर्वी ‘पश्चिमोत्तानासन’ करतांना पायांच्या अंगठ्यापर्यंत हात न पोचणे; पण व्यायाम चालू केल्यापासून ते पोचू लागणे.

३. स्नायूंची शक्ती वाढणे

व्यायाम करतांना शरिराची एखादी स्थिती आधीपेक्षा अधिक वेळ रोखून ठेवू शकणे.

४. शरिराची क्षमता सुधारणे

पूर्वी इमारतीचा एक मजला चढल्यावर पुष्कळ धाप लागणे आणि पाय भरून येत असणे; परंतु व्यायाम चालू केल्यापासून हे न्यून होऊन सहजतेने एक मजला चढता येणे.

व्यायाम केल्याने झालेल्या या पालटांच्या माध्यमातून मिळालेली पोचपावती आपल्याला आपले ध्येय गाठण्याची स्फूर्ती देऊ शकते.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.१०.२०२४)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise