विविध प्रकारच्या तणावाच्या स्थितीत करावयाच्या काही उपाययोजना !
आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक या सगळ्या पातळ्यांवर एकदम गदारोळ होतो, गोष्टी हाताबाहेर होत असतील, तर तुम्हाला ते सहन करावे लागते. असे प्रसंग हाताळावे लागतात, त्याला काही इलाज नसतो. अशा वेळी आलेल्या ‘हतबल’ परिस्थितीला सर्वांनीच कधी ना कधी तोंड दिलेले असते. अशा परिस्थितीत बर्याचदा लोक स्वतःची सहनशक्ती वाढवायच्या प्रयत्नांपेक्षा ‘आयुष्याने माझ्यावर किती अन्याय केला’, या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात आणि जी परिस्थिती आहे, ती स्वीकारायची सोडून त्यावर दुःखी होत रहातात. यामुळे एकतर जे घडते आहे, ते तुम्हाला तुमच्या नजरेतून अधिक मोठे झालेले दिसते आणि त्याचा त्रास अधिक होतो. यामुळे ज्या अवघड परिस्थितीमधून स्वतःला मार्ग काढायचा आहे, त्याविषयी विचारांची स्पष्टता अल्प होते.
अशा वेळी खालील काही गोष्टींचा विचार करता येईल –
१. ‘एखादी गोष्ट माझ्याच बरोबर का होते ?’, हा विचार करण्यापेक्षा ‘मी यावर आता काय करू शकते ?’, हा विचार अधिक उपयोगी ठरतो.
२. सतत दुःखी राहून वेळ वाया न घालवता तुमचा जो दिनक्रम असेल, तो मार्गावर ठेवायचा प्रयत्न करावा. यामध्ये व्यायामाचा अंतर्भाव हवाच.
३. वाईट दिवस येतात, तेव्हा थोडा वेळ स्वतःला जरूर द्यावा, आराम करावा, त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करावा; पण आयुष्य पुष्कळ मोठे आहे. एका गोष्टीवर सतत दुःख करत राहून कुणालाच लाभ नसतो.
४. ध्यान, नामस्मरण; ‘हेही दिवस जातील, अशी श्रद्धा ठेवणे’, हे विचार स्वतःला कठीण परिस्थितीतून बाहेर यायला साहाय्य करतात.
५. आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देणार्या व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञ रहाणे, ही भावना आपल्याला वाईट परिस्थितीत शांत रहायला नक्कीच साहाय्य करते.
६. आपल्या आयुष्यात घडणार्या वाईट घटनांचा राग प्रेमाच्या माणसांवर काढू नका. त्यांच्यापासून स्वतःला लांब करू नका. त्यांनी पुढे केलेला साहाय्याचा हात स्वीकारा. त्यांच्यावर राग काढल्याने ती व्यक्ती कदाचित् दुखावणार नाहीत; पण दुरावतील नक्की.
७. प्राधान्यक्रम ठरवा. तुम्हाला जे हवेच आहे, त्यासाठी प्रयत्नशील रहा. काही गोष्टी सोडून द्या.
८. ‘….यांनी हे केले म्हणून माझी हानी झाली’ किंवा ‘इतर लोक हे करत नाहीत’; म्हणून त्यांना दोष देणे, अशा दोषारोपाने काहीच साध्य होत नाही.
९. मानसिक त्रासाचे शरिरावर गंभीर परिणाम होतातच. स्व-समुपदेशन किंवा वरील उपायांनी आपले मन शांत होत नसेल, तर मनावर काम करणारी औषधे, नस्य शिरोधारा, स्नेहपान हे काही उपक्रम पुष्कळ साहाय्य करतात. यामुळे परिस्थितीला तोंड द्यायची मनाची शक्तीही वाढते.
१०. ‘काय नाही’, यावर वस्तूनिष्ठपणे विचार करून त्यातून मार्ग जरूर काढा; पण त्यावर दुःख करत राहून काहीच हालचाल न करणे, हे सगळ्याच दृष्टीने घातक होऊ शकते.
ज्या गोष्टी पालटता येणार नाही, त्यावर त्रागा न करणे, प्राप्त परिस्थितीत सर्वांत चांगले करायचा प्रयत्न आणि आपल्या परिस्थितीसाठी दुसर्याला दोषी न धरणे यातूंन संकटांना तोंड देतांना बर्याच अंशी मानसिक शक्ती मिळवता येईल हे नक्की !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.