गोव्यात नेपाळ, बांगलादेश यांबरोबरच देहली, बंगाल आणि महाराष्ट्र येथून वेश्या व्यवसायासाठी युवती येतात ! – अन्याय रहित जिंदगी
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – नेपाळ, बांगलादेश, केनया, युगांडा या देशांबरोबरच देहली, बंगाल आणि महाराष्ट्र येथून वेश्या व्यवसायासाठी सर्वाधिक युवती किंवा महिला गोव्यात येत असतात, अशी माहिती वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या युवती किंवा महिला यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणार्या ‘अन्याय रहित जिंदगी’ या अशासकीय संस्थेचे संचालक अरुण पांडे यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणे संबंधितांना सुलभ होते. या ठिकाणी ग्राहकसंख्याही अधिक असल्याने पैसेही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे युवती याकडे आकर्षित होत असतात. अनेक युवती त्यांच्या कुटुंबियांना ‘गोव्यात फिरायला जाते’, असे सांगून या व्यवसायासाठी गोव्यात येत असतात. काही महिला घरातील आर्थिक स्थिती चांगली नसल्याने या व्यवसायाकडे वळत आहेत. सामाजिक माध्यमातून आकर्षक पद्धतीने विज्ञापन करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. हॉटेल, विमाने आणि ‘ट्रॅव्हल’ बुकींग यांचे विविध ‘ॲप्स’ असल्याने वेश्या व्यवसायातील दलालांना त्यांची ओळख लपवून ठेवण्यास साहाय्य होत असते.’’