सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार ‘अष्टांग साधना’ पूर्णत्वाला नेण्यासाठी साहाय्य करणार्या ‘अष्टलक्ष्मी’ !
‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची आठ रूपे प्रगट करून त्यांची आराधना करण्याची संधी आपल्याला दिली आहे. ती आठ रूपे, म्हणजेच ‘आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी !’ श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना (टीप) करण्यास सांगितले आहे. ‘अष्टांग साधनेच्या माध्यमातून या अष्टलक्ष्मींची कृपा आपण कशी अनुभवू शकतो ?’, हे जाणून घेऊया.
टीप – अष्टांग साधना : स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग अन् प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
१. आदिलक्ष्मी
‘आदिलक्ष्मी’ ही विश्वाची उत्पत्ती करते. तीच आपला उगमस्रोत आहे. या आदिशक्तीविषयी ज्ञान झाल्यामुळे सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती मिळते आणि समृद्धी, संतोष अन् आनंद प्राप्त होतो. आदिलक्ष्मीचे तत्त्व जिवाला ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, असा प्रवास करण्यासाठी साहाय्य करते, म्हणजेच त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत (परमात्म्यापर्यंत) पोचण्यासाठी दिशादर्शन करते. आदिलक्ष्मी शांतता आणि आनंद देते. आध्यात्मिक संपत्तीच्या शोधात पुढे मार्गक्रमण करण्यासाठी या देवीचे मोठे योगदान आहे. आदिलक्ष्मी जीवनदायिनी आहे. ही अतिप्राचीन काळापासून ब्रह्मांडात विद्यमान अशी सर्वाेच्च शक्ती किंवा ऊर्जा आहे. वेदांनीही तिची स्तुती केली आहे. देवता, ऋषिमुनी आणि भक्त यांना ती सदैव वंदनीय आहे.
१ अ. भक्ताच्या अंतरात भाव निर्माण करणारी ‘आदिलक्ष्मी’ ! : देवी आदिलक्ष्मी मूळ परमात्मा तत्त्वाविषयी साधकाला ज्ञान प्रदान करते. त्यामुळे त्याच्या मनात त्या परमात्मा तत्त्वाविषयी भाव निर्माण होण्यास साहाय्य होते. परमात्म्याविषयी भाव निर्माण झाला, तरच त्याला प्राप्त करण्याची तळमळही साधकाच्या अंतरात निर्माण होऊ शकते; म्हणूनच परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नरत असणार्या प्रत्येक साधकासाठी आदिलक्ष्मीची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे परमात्म्याविषयी भाव प्रदान करणारी ही आदिलक्ष्मी अष्टांग साधनेतील ‘भावजागृती’ या अंगाद्वारे आपली साधना करून घेते.
१ आ. श्री आदिलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे आदिलक्ष्मी, तू अष्टांग साधनेतील ‘भाव’ या अंगाद्वारे आम्हा सर्वांकडून साधना करून घे. हे विष्णुप्रिये, साक्षात् विष्णुस्वरूप गुरुदेवांप्रती आम्हा सर्वांच्या अंतरातील आध्यात्मिक भावात सातत्याने वृद्धी होऊ दे’, हीच तुझ्या श्री चरणी भक्तीपूर्वक प्रार्थना आहे.
२. धनलक्ष्मी
‘धनलक्ष्मी’ ही भौतिक संपत्तीची देवता आहे. धनलक्ष्मी ही पैसा, सोने इत्यादी संपत्तीसह इच्छाशक्ती, धैर्य, दृढनिश्चय आणि उत्साहसुद्धा देते. धनलक्ष्मी ही भौतिक आणि बौद्धिक, अशा दोन्ही संपत्तींची देवता आहे.
२ अ. साधकांना त्याग करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ‘धनलक्ष्मी’ ! : धनलक्ष्मी धन देऊन ‘सत्कार्यासाठी त्याचा विनियोग कसा करायचा ?’, हे शिकवणारी देवता आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना तन-मन-धनाचा त्याग करायला शिकवला. हा त्याग करण्यासाठी जी देवता आपल्याला प्रोत्साहित करते, तीच ही धनलक्ष्मी !
पैसा किंवा ऐहिक संपत्ती हे साधकांचे खरे धन नव्हे, तर साधनेद्वारे प्राप्त होणारे विविध अनुभव, अनुभूती आणि सद्गुण हे साधकांचे खरे धन आहे ! सद्गुण ही साधकांसाठी अक्षय्य संपत्ती आहे. या इहलोकात मिळवलेले धन, म्हणजे पैसा मृत्यूनंतर आपल्या समवेत येत नाही. तो इथेच सोडून जावा लागतो; मात्र साधनेद्वारे मिळवलेले गुण आणि आध्यात्मिक प्रगती यांच्या रूपातील अक्षय्य धन मात्र आपण कुठेही गेलो, तरी अगदी मृत्यूनंतरही आपल्या समवेतच येते. आत्म्याचा परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रवास जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे गुणरूपी धन त्याच्या समवेतच असते. हेच अक्षय्य धन प्राप्त होण्यासाठी धनलक्ष्मी कृपाशीर्वाद देते.
२ आ. श्री धनलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे देवी धनलक्ष्मी, धनाचा विनियोग करतांना आमच्या अंतरी ‘हे धन म्हणजे तुझीच कृपा आहे’, ही जाणीव असू दे. हे धन साक्षात् गुरूंचे आहे. त्यामुळे आमच्याकडून धनाचा वापर काटकसरीने करून घे. उदरनिर्वाहासाठी धन प्राप्त करत असतांना त्यात आमचे मन गुंतू देऊ नकोस. हे देवी, ‘आम्हाला सद्गुुणरूपी आध्यात्मिक धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी तूच आशीर्वाद दे’, अशी तुझ्या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.
३. धान्यलक्ष्मी
‘धान्यलक्ष्मी’ हे धान्यरूपी संपत्तीचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मीचे रूप आहे. धान्यलक्ष्मी ही अन्नधान्याद्वारे जिवांचे पोषण करते. तिच्या कृपेने घरात धान्य टिकून रहाते. लक्ष्मीचे हे रूप निसर्गाच्या किमयेचे प्रतीक आहे. निसर्गाप्रमाणे धान्यलक्ष्मीही समानतेची शिकवण देते. अन्नाविना कुणीही जगू शकत नाही; म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात धान्यलक्ष्मीचे स्थान अविभाज्य आहे. ही पृथ्वी आणि निसर्ग यांच्या कृपेचे वरदान देणारी देवी आहे.
३ अ. ‘नामा’चे बीज अंतरी रुजवणारी ‘धान्यलक्ष्मी’ ! : धान्यलक्ष्मी, म्हणजेच विपुलतेने धान्य देणारी देवता ! ज्याप्रमाणे धान्याचा एक दाणा पेरला की, सहस्रो पटींनी धान्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे श्री गुरूंनी दिलेले नाम अत्यंत श्रद्धेने घेतल्यावर आपल्याला त्या नामाचा लक्ष पटींनी लाभ होतो. अशा प्रकारे अष्टांग साधनेतील ‘नामा’चे बीज अंतरी रुजवणारी देवी, म्हणजे धान्यलक्ष्मी !
३ आ. श्री धान्यलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे धान्यलक्ष्मी, ‘तू पृथ्वीतलावरील आम्हा सर्व जिवांचे पोषण करतेस’, याबद्दल आमच्या मनात सातत्याने कृतज्ञतेचा भाव जागृत राहू दे. श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांनी दिलेले नामरूपी बीज आमच्या अंतरात खोलवर रुजू दे, जेणेकरून आमच्याकडून अखंड नामस्मरण होऊन त्याचा आम्हाला अनंत पटींनी लाभ होईल’, हीच तुझ्या श्री चरणी अनन्यभावाने प्रार्थना आहे.
४. गजलक्ष्मी
या देवीची हत्तींद्वारे पूजा केली जाते; म्हणून तिला ‘गजलक्ष्मी’, असे म्हटले आहे. तिच्या दोन्ही बाजूंना असलेले गज आपल्या सोंडेतून जल शिंपडून जणू देवीला जलाभिषेकच करत असतात. हे जलसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. गजलक्ष्मीच्या पूजनाने ऐश्वर्य, सौभाग्य आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते. गजलक्ष्मीची पूजा विशेषतः दीपावलीच्या वेळी केली जाते.
४ अ. ‘सत्संग’रूपी आनंद प्रदान करणारी ‘गजलक्ष्मी’ ! : जीवनात सद्विचारांची समृद्धी अत्यंत आवश्यक असते. ही सद्विचारांची समृद्धी प्राप्त होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगातून सत्च्या विविध विचारांची देवाण-घेवाण होत असते आणि त्यामुळे आपल्याला विचारांची समृद्धी प्राप्त होते. गजलक्ष्मीमध्ये क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचे स्वरूप कार्यरत आहे. त्यामुळे विचारसमृद्धीचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्या देवीचे कृपाशीर्वाद आवश्यक आहेत, ती देवी म्हणजेच गजलक्ष्मी !
ज्याप्रमाणे गजलक्ष्मीच्या समवेत असलेले गज तिच्या सान्निध्यात राहून तिचा सत्संग प्राप्त करतात, त्याप्रमाणे आपणही सदैव सत्संगात रहायला हवे, तरच आपले मन सदैव सत्च्या, म्हणजे ईश्वरी विचारांच्या माध्यमातून ईश्वरी अनुसंधानात रहाण्यास साहाय्य होईल आणि अष्टांग साधनेतील ‘सत्संग’ हे अंग आपल्याकडून साध्य होईल. ‘आपल्या मनाला मायेतील अन्य कोणत्याही विचारांमध्ये न अडकवता त्याला निरंतर ईश्वराच्या विचारांमध्ये रमवणे’, हासुद्धा एक सत्संगच आहे. असा हा सत्संगरूपी आनंद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण गजलक्ष्मीला शरण जाऊया.
४ आ. श्री गजलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ! : ‘हे गजलक्ष्मी, आम्हाला निरंतर सत्संगात ठेव. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने निरंतर प्राप्त होणार्या सत्संगांचा लाभ आम्हाला आमच्या उद्धारासाठी करून घेता येऊ दे. ‘सत्संग म्हणजे साक्षात् गुरुदेवांचाच परम चैतन्यदायी सूक्ष्म सहवास आहे’, याची जाणीव आम्हाला होऊ दे. हे गजलक्ष्मी, आमचे मन मायेच्या विचारांमध्ये न अडकता ते ईश्वराच्या विचारांमध्ये रमू दे. त्याद्वारे आम्हाला अखंडपणे सत्संगाची अनुभूती घेता येऊ दे’, अशी तुझ्या चैतन्यदायी चरणी प्रार्थना !’
‘संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी’, यांविषयीची माहिती लेखाच्या पुढील भागात पाहूया.’ (क्रमशः)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२८.१०.२०२४)