Ayodhya RamMandir Diwali : ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अयोध्येत पहिलीच दिवाळी ! – पंतप्रधान

नवी देहली – दिवाळीच्या सणाविषयी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी अयोध्या २८ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) नुकतेच एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, यंदाची दिवाळी अत्यंत विशेष असणार आहे; कारण ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरात श्रीरामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. या वेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या.

५१ सहस्रांहून अधिक जणांना नियुक्तीपत्रांचे वाटप !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत ५१ सहस्रांहून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्तीपत्रांचे वाटप करून नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व तरुणांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले की, देशातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकर्‍या देण्याची प्रक्रिया भारत सरकार करत आहे. भाजपशासित राज्यांमध्येही लाखो तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

हरियाणा सरकारचे केले कौतुक !

हरियाणा सरकारमध्ये नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुणांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, हरियाणात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने अनुमाने २६ सहस्र तरुणांना रोजगाराची संधी देऊन एक चांगला पुढाकार घेतला आहे.