Army Dog Phantom Martyred : काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढतांना भारतीय सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण

भारतीय सैन्याचा श्‍वान “फँटम” (संग्रहित छायाचित्र)

अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथे २८ ऑक्टोबरला नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या जिहादी आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीच्या वेळी सैन्यात तैनात असणारा ४ वर्षांचा ‘फँटम’ नावाचा बेल्जियन शेफर्ड जातीचा श्‍वान वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत फँटमला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याच्या ‘व्हाईट नाइट कॉर्प्स’ या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. यात म्हटले की, आम्ही आमच्या नायकाच्या सर्वोच्च त्यागाला नमस्कार करतो. फँटम आमच्या श्‍वानपथकामधील एक शूरवीर होता. त्याची निष्ठा कधीही विसरता येणार नाही.

मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्‍वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्‍वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.

लपून बसलेल्या आतंकवाद्यांचा माग काढण्यासाठी भारतीय सैन्याकडून श्‍वानांचा वापर केला जातो. श्‍वानांना विविध गॅझेट (उपकरणे) लावलेली असतात, त्यांवरून आतंकवाद्यांचे ठिकाण आणि अंतर तपासले जाते.