Karnataka Waqf Property : कर्नाटकातील १ सहस्र २०० एकर भूमीवरील वक्फचा दावा काँग्रेस सरकारने घेतला मागे !

  • केवळ ११ एकर भूमीच वक्फची !

  • चुकीचा दावा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होणार

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच्.के. पाटील

विजयपुरा (कर्नाटक) – विजयपुरा जिल्ह्यातील  तिकोटा तालुक्यातील होनावाडा गावातील ४१ शेतकर्‍यांना त्यांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या असल्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ही अनुमाने १ सहस्र २०० एकर भूमी आहे. या नोटिसांना शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच्.के. पाटील यांनी सांगितले की, बजावलेल्या नोटिसा मागे घेतल्या जातील. शेतकर्‍यांची भूमी वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत रूपांतर करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही आणि जर काही चूक झाली असेल, तर ती सुधारण्यात येईल. तसेच उत्तरदायींवर कारवाई केली जाईल.

मंत्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचे उपायुक्त याची चौकशी करतील. पाठवलेल्या नोटिसा मागे घेण्यासाठी कारवाई चालू करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल. १ सहस्र २०० एकरांपैकी केवळ ११ एकर जागा वक्फची संपत्ती आहे. समस्या सोडवण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल स्थापन करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

शेतकर्‍यांनी याला विरोध केला नसता, तर ही भूमी वक्फ बोर्डाच्या घशात गेली असती ! त्यामुळे केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणेच आवश्यक आहे. यासाठी आता देशभरातील हिंदूंनी सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !