Islamic NATO : पाकिस्तानसह २० हून अधिक इस्लामी देश स्वतंत्र सैन्यसंघटना स्थापन करणार !

आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्याचे सुतोवाच

नवी देहली – पाकिस्तानसह आशिया आणि आफ्रिका खंडांतील २० हून अधिक इस्लामी देश मिळून ‘नाटो’ (३० हून अधिक देशांची सैन्यसंघटना) प्रमाणे स्वतंत्र ‘मुस्लिम नाटो’ची (सैन्यसंघटनेची) स्थापन करणार आहेत. या गटात मुख्य सदस्य म्हणून सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्कीये, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, बहरीन, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि मलेशिया या देशांचा समावेश असेल. सहयोगी सदस्य म्हणून अझरबैजान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ब्रुनेई हे देश सहभागी होऊ शकतात. इंडोनेशिया, इराण, इराक, ओमान, कतार, कुवेत, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया आणि लिबिया हे प्रमुख भागीदार देश त्यांना पाठिंबा देऊ शकतात. आतंकवादाच्या विरोधात कारवाई करणे आणि मुसलमान ऐक्याला प्रोत्साहन देणे, हे या गटाचे मुख्य उद्दिष्ट असेल.

यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये ‘इस्लामिक मिलिटरी काउंटर टेररिझम कोलिशन’ नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आशिया आणि आफ्रिका या खंडांतील ४२ मुसलमान देशांचा यामध्ये समावेश होता. आतंकवादाच्या विरोधात लढा देण्यासाठी या  संघटनेची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था आजही कार्यरत आहे.

भारत आणि मुसलमान देश यांच्यातील तणाव वाढणार !

या ‘मुस्लिम नाटो’मुळे भारत आणि मुसलमान देश यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. हा गट पाकिस्तान आणि बांगलादेश यांना साहाय्य करून भारतीय उपखंडातील स्थानिक राजकीय, राजनैतिक आणि सामरिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो. हा गट काश्मीरच्या प्रकरणीही नाक खुपसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

संपादकीय भूमिका

आज जगभरातील आतंकवादासाठी जिहादी आतंकवाद्यांना उत्तरदायी ठरवले जात आहे. इस्लामी देशांच्या स्वतंत्र सैन्यसंघटनेतील सदस्य देशांची नावे पहाता, त्यांतील अर्ध्याहून अधिक देश आतंकवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खतपाणी घालत असतात. त्यामुळे या संघटनेला प्रथम तिच्याच सदस्य देशांविरुद्ध कारवाई करावी लागेल ! तसे ती कधीही करणार नाही; म्हणूनच ही सैन्यसंघटना स्थापन करण्याची घोषणा, म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे !