उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करा ! – Swami Anand Swaroop

‘काली सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्‍वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांची मागणी

काली सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्‍वर स्वामी आनंद स्वरूप महाराज

हरिद्वार (उत्तराखंड) – ‘काली सेना’ या धार्मिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्‍वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘देवभूमी उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद, थूक जिहाद, लँड जिहाद यांसारखे अनेक जिहाद समोर येत आहेत. सरकारच्या निष्काळजीपणाचा हा परिणाम आहे. जर उत्तराखंडमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर १२ जानेवारी २०२५ पर्यंत बंदी घातली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि  हे आंदोलन इतके तीव्र असेल की, सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नानंतरही ते थांबणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी उत्तराखंडमधील भाजप सरकारला दिली आहे. ‘त्यापूर्वी उत्तराखंडमध्ये अडीच महिने लोकांशी संपर्क साधला जाईल’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

हरिद्वार आणि ऋषिकेश येथे अहिंदूंना रहाणे, भूमी खरेदी करणे यांवर कायद्याने आहे बंदी !

हरिद्वारमध्ये माध्यमांशी संवाद साधतांना स्वामी आनंद स्वरूप म्हणाले की, उत्तराखंडमधील प्रत्येक गावात आणि शहरात लोकांना जागरुक केले जाईल आणि जनतेचा पाठिंबा मिळवला जाईल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उत्तराखंड राज्याचे इस्लामीकरण होऊ देणार नाही. वर्ष १९१५ मध्ये हरिद्वार आणि ऋषिकेश येथे एक कायदा लागू करण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत अहिदूंसाठी येथे कायमचे रहाणे, भूमी खरेदी करणे किंवा इतर मालमत्ता खरेदी करणे अवैध आहे. हा नियम अजूनही लागू आहे. उत्तराखंड सरकारने या कायद्याचा विस्तार करून तो संपूर्ण राज्यात लागू करावा, अशी आमची इच्छा आहे. उत्तराखंडच्या इस्लामीकरणाविषयी सरकार निष्काळजी राहिले आहे. सुनियोजित कटाचा भाग म्हणून उत्तराखंडचे इस्लामीकरण केले जात आहे.

उत्तराखंडला काश्मीर होण्यापासून वाचवायचे आहे !

स्वामी आनंद स्वरूप पुढे म्हणाले की, राज्य सरकार झोपले असून आम्हाला सरकारला जागे करायचे आहे. हिमालय हे कुणाला रहाण्यासाठीचे नव्हे, तर तपस्वींचे ठिकाण आहे. ती एक आध्यात्मिक भूमी आहे. हिमालय हे आम्हा हिंदूंचे मंदिर आहे. हिमालयातील देवत्व आपल्याला वाचवायचे आहे. उत्तराखंड आणि हिमालयाचा प्रदेश वर्ष १९९० चा काश्मीर बनत आहे आणि आपल्याला उत्तराखंडाला काश्मीर होण्यापासून वाचवायचे आहे. उत्तराखंड सरकारला काहीच समजत नाही.

संपादकीय भूमिका

एका संतांना अशी मागणी करावी लागते, याचाच अर्थ परिस्थिती गंभीर आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी गांभीर्याने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ शकते !