कुणकेश्वर येथील समुद्रात खलाशाची हत्या करून मासेमारी नौकेला लावली आग : एक जण पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – राजीवाडा, रत्नागिरी येथील अरफत हमीद फणसोपकर यांच्या मालकीच्या यांत्रिक मासेमारी नौकेवर काम करणार्‍या एका खलाशाने त्याच्या सहकार्‍याची हत्या केली आणि त्यानंतर नौकेला आग लावली. ही घटना २८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समुद्रात घडली. या प्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (मूळ रहाणार छत्तीसगड) याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या घटनेत फणसोपकर यांची दीड कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

फणसोपकर यांची नौका घेऊन खलाशी आणि तांडेल मासेमारीसाठी गेले होते. कुणकेश्वर जवळील समुद्रात नौका आल्यावर विश्वकर्मा आणि तांडेल रवींद्र नाटेकर यांच्या वाद होऊन तो विकोपाला गेला. त्यामुळे चिडलेल्या विश्वकर्मा याने नाटेकर यांची हत्या केली आणि नौका पेटवून  दिली. याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, तटरक्षक दलाचे पथक आणि स्थानिक अन्य मासेमार यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, तसेच संशयित आरोपी विश्वकर्मा याला कह्यात घेतले.