दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा नाही ! ; बोरीवली पूर्व येथे शिवसेना आणि ठाकरे गट यांत बाचाबाची …

पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा नाही !

मुंबई – पूर्व विदर्भात ठाकरे गटाला केवळ एकच रामटेकची जागा मिळाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. गोंदियामध्ये एकही जागा मिळालेली नाही. गडचिरोलीतही ठाकरे गटाला जागा नाही. वर्धा येथेही ठाकरे गटाला एकही जागा नाही. या पार्श्वभूमीवर ‘जशी विदर्भात काँग्रेस तशी मुंबईत शिवसेना जिंकणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.


बोरीवली पूर्व येथे शिवसेना आणि ठाकरे गट यांत बाचाबाची

मुंबई – बोरीवली पूर्व येथे निघालेल्या रॅलीमध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांचे कार्यकर्ते समोर आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याने एकच गदारोळ उडाला.


नाशिक येथे सुहास कांदे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला दमदाटी

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे सुहास कांदे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे कार्यकर्ते विनोद शेलार यांना कांदे यांनी चांगलेच धारेवर धरत दमदाटी केली. या वेळी शिवराळ भाषाही वापरली. या वेळी त्या कार्यकर्त्याला कांदे म्हणाले की, तू प्रचार कर, पैसे वाट; परंतु एकेरी उल्लेख करू नकोस.


संजय निरूपम यांच्या उमेदवारीला विरोध !

मुंबई – शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश घेतलेले संजय निरूपम यांना मालाड, दिंडोशी येथील आप्पा पाडा येथे उमेदवारी देण्यात आली होती; परंतु यामुळे तेथील शिवसेनेचे नेते वैभव भरडकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच उमेदवारी देण्यासाठी आंदोलन केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरूपम हे बाहेरचे उमेदवार नको म्हणून त्यांना विरोध केला.


मीरा भाईंदर येथे गीता जैन उभ्या रहाणार !

मुंबई – मीरा भाईंदर येथे भाजपच्या ३ र्‍या सूचीत गीता जैन यांचे नाव न आल्याने त्या अपक्ष अर्ज भरून उभ्या रहाणार आहेत.


अमित ठाकरे यांच्या विरोधात सरवणकर ?

मुंबई – राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उभे राहू नये म्हणून सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याविषयी सांगितले असल्याचे समजते; परंतु सदा सरवणकर यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सला उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे घोषित केले आहे.


सुरेश नवले यांना मनोज जरांगे यांचा पाठिंबा !

बीड – येथील विधानसभा मतदारसंघात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेऊन माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.