सकल हिंदु समाजाच्या मागण्यांचा घोषणापत्रात समावेश करण्याविषयी प्रयत्नशील ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

लव्ह जिहाद, लँड जिहादच्या विरोधात कठोर कायद्यांसह अन्य सूत्रांचा अंतर्भाव करणार !

श्री. धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘अंमलबजावणीचा आराखडा’ म्हणून महायुतीचे संकल्पपत्र जनतेसमोर येणार आहे. याची जी १५ जणांची समिती आहे, त्याचा मी सदस्य आहे. या समितीने राज्यभरातून जनतेची मते मागवली आहेत. या संदर्भात २८ ऑक्टोबरला सकल हिंदु समाजाच्या प्रतिनिधींनी भेटून त्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने लव्ह जिहाद, लँड जिहादच्या विरोधात कठोर कायदा करावा, गोतस्करीच्या विरोधात कठोर कायदा करावा यांसह अन्य मागण्या आहेत. यातील बहुतांश मागण्या या रास्त असून त्यांचा समावेश घोषणापत्रात केला जाईल, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले. सकल हिंदु समाजाच्या वतीने खासदार श्री. धनंजय महाडिक यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले.

श्री. धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘या समितीकडे लाखोंच्या संख्येने सूचना आमच्याकडे आल्या आहेत. येत्या ३-४ दिवसांत या समितीची बैठक होऊन याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल. वरील मागण्यांसमवेत गड-दुर्गांवरील अतिक्रमण निघाले पाहिजे, ही सकल हिंदु समाजाची आग्रही मागणी आहे. हिंदूंना न्याय देण्याच्या दृष्टीने केंद्रशासन ‘वक्फ’च्या संदर्भात कायदा करत आहे. त्यामुळे सकल हिंदु समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचा घोषणापत्रात समावेश करण्याच्या दृष्टीने निश्चित माझे प्रयत्न रहातील.’’

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. अर्जुन आंबी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती’चे श्री. आनंदराव पवळ, ‘चिंतामणी सेवक फाऊंडेशन’चे श्री. सोहम कुराडे, श्री. संग्रामसिंह निकम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.

बांगलादेशी घुसखोर-रोहिंग्या यांचा बंदोबस्त नागरिकांनी करावा ! 

बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या कायद्याची वाट पहाण्याची आवश्यकता नाही. कोल्हापूर जिल्ह्यात शिंगणापूर गावात मध्यंतरी असे घुसखोर सापडले होते. भारत देश म्हणजे आपले घर असून त्या दृष्टीने विचार केल्यास आपले घर सुरक्षित ठेवण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकाचे आहे. या पुढील काळात नागरिकांना कुठेही बांगलादेशी घुसखोर अथवा रोहिंग्या दिसले, तर त्यांना बाहेर हाकलून काढावे. अशांची माहिती आम्हाला द्यावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही श्री. धनंजय महाडिक यांनी या प्रसंगी सांगितले.

सकल हिंदु समाजाच्या काही मागण्या –

१. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करावे.

२. महाराष्ट्रातील अनधिकृत मदरसे आणि मशिदी यांचे तातडीने सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे.

३. सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या संदर्भात अवमानकारक पोस्ट टाकून भावना दुखावणारे, स्टेट्स ठेवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांवर किंवा भ्रमणभाषचे सीम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे; त्याच्यावर गुन्हे नोंद करण्याविषयी कायदा करावा.

४. मदरशांना शासकीय अनुदान देणे बंद करावे.

५. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यात यावीत.

६. हिंदु तरुणांवर विविध आंदोलनात विनाकारण प्रविष्ट झालेले गुन्हे मागे घ्यावेत