सायबर गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

(टीप : ‘सायबर गुन्हा’ म्हणजे संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करून केला जाणारा गुन्हा !)

‘प्रतिदिन आणि प्रत्येक ठिकाणी सायबर गुन्ह्यांच्या संख्येत होणारी भौमितिक वाढ ही केवळ चिंताजनकच नाही, तर वेदनादायीही आहे. श्रीमंत किंवा गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षित, पुरुष आणि स्त्रिया, वृद्ध, तसेच तरुण असो जवळजवळ प्रत्येक जण यामध्ये फसत आहे. याला कुणीही अपवाद नाही. गुन्हेगार सहसा अदृश्य असतात आणि दिसल्यास त्यांची ओळख बनावट असते. फसलेले लोक भोळे, संशय न बाळगणारे असतात. ते सहजपणे डावपेचांना फसतात. हे पीडित लोक बहुतेक वेळा लाज किंवा भीती वा जागरूकतेच्या अभावामुळे या गुन्ह्यांची तक्रार करत नाहीत. जेव्हा त्यांची फसवणूक झाली आहे, हे त्यांना कळते, तेव्हा बराच काळ निघून गेलेला असतो आणि तोपर्यंत व्यवहार पूर्ण होऊन हस्तांतरित केलेली रक्कम गुन्हेगारांनी काढून घेतलेली असते.

१. पीडितांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून विशिष्ट तंत्राचा वापर

श्री. प्रवीण दीक्षित

सायबर गुन्ह्यांचे स्वरूप ठिकाण आणि घटना यांनुसार पालटते. ती खोट्या ‘पोर्टल’द्वारे (संकेतस्थळाद्वारे) ‘इक्विटी मार्केट’मधील (आस्थापनाच्या समभागाच्या व्यवहारासाठी उपलब्ध व्यासपीठ) गुंतवणूक असू शकते, ती एखाद्या नामांकित कंपनीच्या नावाने नोकरीची आकर्षक योजना असू शकते, तो वैवाहिक प्रस्ताव असू शकतो किंवा त्याला ‘डिजिटल अटक’ म्हटले जाऊ शकते. (‘डिजिटल अटक’, म्हणजे सायबर गुन्हेगार कायदे-नियमांची जरब दाखवत लोकांची फसवणूक करणे) सायबर गुन्हेगार पीडितांना फसवण्यासाठी ‘एस्.ई.ओ.’ (‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’, म्हणजे विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून स्वतःचे संकेतस्थळ किंवा ‘ब्लॉग’ सर्च इंजिनमध्ये मानांकन करण्याची प्रक्रिया) अधिकाधिक लाभ घेत आहेत. ‘एस्.ई.ओ.’च्या हाताळणीमुळे गुन्हेगारांना फसव्या संकेतस्थळांना शोध परिणामांच्या शीर्षस्थानी स्थान देण्याची अनुमती मिळते. त्यामुळे ही संकेतस्थळे वैध आणि विश्वासार्ह वाटतात अन् संवेदनशील अशी वैयक्तिक अन् आर्थिक माहिती सामायिक करण्यासाठी पीडितांची फसवणूक करतात. फसवणूक करणारे बनावट (खोटे) संकेतस्थळ सिद्ध करतात, जी वैध व्यवसाय, ऑनलाईन दुकाने किंवा आर्थिक आस्थापन वाटते.

२. पीडित व्यक्तीची विविध प्रकारे खासगी माहिती मिळवण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न

तुमच्या संकेतस्थळाला शोधण्याच्या प्रक्रियेत सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी सशुल्क प्रक्रिया आहे. अशी संकेतस्थळे मूळ संकेतस्थळासारखीच दिसतात. जेव्हा पीडित व्यक्ती पुढे जाते, तेव्हा एका माध्यमातून पैसे तिसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात. पीडिताची कागदपत्रे तिसर्‍या पक्षाशी सामायिक करतांना बँक कर्मचारी हे अशा गुन्ह्यांचा भाग असू शकतात, असा संशय आहे. बँक खातेधारकाचे ‘के.वाय्.सी.’ (खातेधारकाची ओळख पटवण्यासाठीची कागदपत्रे) अद्ययावत् केले गेले पाहिजे; परंतु अनेक बँका याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे खात्याच्या माहितीचा मागोवा घेण्यात अडचणी येतात. कर्जाची ‘ॲप्स’ आणि ‘गेमिंग ॲप्स’ (ऑनलाईन खेळ खेळण्याची प्रणाली) हे खासगी माहिती गमावण्याचे आणखी एक माध्यम आहे. ‘फेडेक्स’ कुरियरच्या नावे करण्यात येणारा घोटाळा सध्या शिखरावर आहे. कधी कधी आकर्षक सवलत देणार्‍या अज्ञात आणि बनावट व्यक्तीच्या कॉलद्वारे सायबर गुन्हे घडू शकतात किंवा कधीही न घडलेल्या गुन्ह्यासाठी धमकी देऊ शकतात.

गॅस जोडणी देणार्‍या कंपनीच्या नावाने तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील अद्ययावत् करण्यास सांगतात आणि बँक खात्याचे तपशील मागणे, असे होऊ शकते. संगणकीय पत्राद्वारे तुम्हाला तुमचे वैयक्तिक बँक तपशील देण्यास सांगितले जाऊ शकते किंवा ‘व्हिडिओ कॉल’द्वारे तुम्हाला ‘डिजिटल अटक’ केली जाऊ शकते आणि त्वरित मोठ्या रकमेची मागणी केली जाऊ शकते. पैसे भरून पूर्ण होईपर्यंत फसवणूक करणारे खोलीच्या बाहेरही जाऊ देणार नाहीत. निवृत्तीनंतरचे लाभ आकर्षक परताव्यात गुंतवू इच्छिणार्‍या अलीकडेच निवृत्त झालेल्या व्यक्ती किंवा भारतात अथवा परदेशात नोकरीचा प्रस्ताव शोधत असलेले बेरोजगार तरुण याला फसू शकतात वा अशा प्रकारे फसण्यामध्ये लग्नाच्या प्रस्तावात स्वारस्य असलेली एक तरुण स्त्री असू शकते.

३. खोटी आश्वासने देऊन पीडितांना आकर्षित करणे

महिलांना आमीष दाखवून किंवा त्यांची अश्लील छायाचित्रे प्रकाशित करण्याची धमकी दिली जाण्याचीही उदाहरणे आहेत. खोट्या आश्वासनांसाठी तुम्हाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक संभाव्य युक्ती वापरली जाते. तुमच्या लोभामुळे तुम्हाला असामान्य परताव्याचे आमीष दाखवणे किंवा आपण पात्र नसतांना तुमच्या स्वप्नाची पूर्तता होण्याची अपेक्षा करणे, अशा प्रकारे सायबर गुन्हेगार फसवू शकतात. निःसंशयपणे, भरपूर पैसा असलेल्या व्यक्ती या युक्त्यांना फसतात आणि दुर्दैवाने ते सामाजिक माध्यम किंवा भ्रमणभाष हाताळणारे अथवा संगणकाचे जाणकारही असतात.

४. भारतीय तरुणांची तस्करी करून त्यांना सायबर घोटाळे करण्यास भाग पाडणारे पाकिस्तान किंवा चीन येथील गुन्हेगार !

काही प्रकरणांमध्ये जेथे कायद्याची कार्यवाही करणार्‍या संस्था गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी झाल्या आहेत, तेथे या गुन्हेगारांनाही पैसे कुठे हस्तांतरित केले गेले आहेत, याची माहिती नसते. १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, ‘यंत्रणेच्या अन्वेषणात असे उघड झाले आहे की, ‘लाओ पीडीआर्’मधील सुवर्ण त्रिकोण प्रदेशात असुरक्षित भारतीय तरुणांची तस्करी करण्यात ५ व्यक्तींचा सहभाग होता. तिथे या तरुणांना युरोपियन आणि अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून सायबर घोटाळे करण्यास भाग पाडले गेले. त्यांच्या मानवी तस्करीसाठी एक आघाडी म्हणून काम करत होती. त्यांनी ‘ऑल इंटरनॅशनल सर्व्हिसेस’ या सल्लागार संस्थेच्या माध्यमातून काम केले.  (संदर्भ : The Perfect Voice, Oct 11, 2024). खरे गुन्हेगार एक तर चीन किंवा पाकिस्तान येथील आहेत आणि ते भारत, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये या सायबर गुन्ह्यांद्वारे धुमाकूळ घालत आहेत, असे लक्षात येत आहे.

५. सायबर गुन्ह्यांच्या सतर्कतेविषयी भारतीय बँकांकडून ग्राहकांना सूचना

‘भारतीय न्याय संहिता २०२३’ आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा’ यांच्या अंतर्गत विविध प्रावधानांनुसार गुन्हे नोंदवण्याच्या व्यतिरिक्त भारतीय रिझर्व्ह बँक अन् इतर सार्वजनिक, तसेच खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना अन् सर्वसाधारणपणे जनतेला फसवणूक करणार्‍यांपासून सावध करण्यासाठी आणि त्यांचे खात्याचे तपशील उघड न करण्यासाठी सतत सतर्क करत आहेत. त्यांनी त्यांच्या ‘हेल्पलाईन्स’चे विज्ञापनही केले आहे, जिथे पीडितांना लवकरात लवकर तक्रार करण्यास सांगितले जाते.

(क्रमशः)

– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई. (२३.१०.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849541.html