साधकांनो, परात्पर गुरु डॉक्टरांचे नियोजन ही ईश्वरेच्छा असल्याने साधकाची ६० टक्के आध्यात्मिक पातळी किंवा संतपद घोषित होतांनाच्या गोड गुपितातून आनंद घेऊया !

पू. शिवाजी वटकर

‘एखाद्या साधकाचे साधनेचे प्रयत्न चांगले होत असतील, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने इतर काही निकषांप्रमाणे, उदा. प्रारब्ध, पूर्वजन्मीची साधना, मनोलय अन् बुद्धीलय होणे इत्यादींनुसार प्रगती होत असेल, तर इतरांनाही ‘साधकाची आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे जाणवू लागते. सहसाधक, संत आणि सद्गुरु यांना त्याच्या आध्यात्मिक प्रगतीची लक्षणेही दिसू लागतात. त्या वेळी त्या साधकाची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होऊन ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी झालेली असते किंवा त्यांनी संतपद गाठलेले असते.

सर्वज्ञ अशा परात्पर गुरु डॉक्टरांना ‘एखाद्या साधकाची आध्यात्मिक प्रगती केव्हा होणार ?’ आणि ‘ती कधी झाली आहे ?’, याविषयी सर्व ज्ञात असते. साधकाची प्रगती झाली की, आनंद अन् चैतन्य यांचे मूर्तीमंत स्वरूप असलेल्या गुरुदेवांना अत्यानंद होतो आणि तो आनंद त्यांना प्रगती झालेल्या साधकासमवेतच अन्य साधकांनाही द्यायचा असतो. त्यामुळे गुरुदेव अशा प्रसंगांचे गोड गुपित उघडे करतांना साधकांना उच्च भाव आणि आनंद यांच्या स्थितीला घेऊन जातात. व्यवहारात बर्‍याच अप्रिय गोष्टींच्या अज्ञानात आनंद असतो, तर साधनेमधील प्रगतीचे हे गुपित केवळ गोड नसून सर्वांसाठीच आनंदमय, भावमय आणि चैतन्यमय असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने हा आनंददायी आणि अमृतमय प्रसाद सर्वांना एकदम मिळतो अन् सार्‍यांचाच आनंद द्विगुणित होतो.

(व्यावहारिक दृष्टीने काही म्हणी आहेत, उदा. अज्ञान म्हणजे आनंद [Ignorance is Bliss] किंवा झाकली मूठ सव्वा लाखाची ! बर्‍याच गोष्टींविषयी आपल्याला व्यवहारात अज्ञान असते, उदा. ‘उपाहारगृहात खायला मिळणारे पदार्थ कसे सिद्ध होतात ?’ जोपर्यंत आपल्याला हे ज्ञात नसते, तोपर्यंत ते पदार्थ खाण्यातला आनंद (सुख) आपण उपभोगतो; परंतु ‘ते पदार्थ बनतांना कसे बनवले जातात ? त्यांत काय काय मिसळलेले असते ? तेथील स्वच्छता कशी राखली जाते’, हे आपल्याला कळले, तर कदाचित आपण ते खाऊ शकणार नाही, म्हणजे आपल्याला दुःख होईल; म्हणून ‘अज्ञानात सुख (आनंद) असते’, असे म्हणतात. – संकलक)

त्यामुळे एखाद्या साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी कुणाला आधीच कळले असले, तरी ‘सर्व साधक आणि समष्टी यांना आनंद मिळावा’, यासाठी ते गुपित उघड होण्याची योग्य वेळ येईपर्यंत साधकांनी संयम बाळगावा अन् त्या आनंदात योग्य वेळी सहभागी व्हावे !’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल, (१४.३.२०२२)