Zelenskyy on PM Modi : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांचा पुनरुच्चार
नवी देहली – दुसरी युक्रेन शांतता शिखर परिषद नवी देहलीमध्ये व्हावी. पंतप्रधान मोदी यांची इच्छा असेल, तर ते ही परिषद आयोजित करू शकतात. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो, असे मत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले. झेलेंस्की यांनी अशाच प्रकारची विधाने यापूर्वीही केली आहेत.
झेलेंस्की पुढे म्हणाले की,
१. पंतप्रधान मोदी लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यांच्या दृष्टीने फार मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. कोणताही संघर्ष रोखण्यात भारत आणि मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो. युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा ते निश्चितच प्रयत्न करू शकतात.
२. रशियाने युक्रेनच्या सहस्रो मुलांचे अपहरण केले आहे. आमच्या मुलांना परत आणण्यासाठी मोदी यांनी साहाय्य करावे, अशी आमची इच्छा आहे. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनच्या १ सहस्र मुलांना परत देण्यास सांगू शकतात. जर मोदी यांनी हे केले, तर आम्ही आमच्या बहुतेक मुलांना परत आणण्यात यशस्वी होऊ शकतो.
३. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यावर झेलेंस्की म्हणाले की, जर कुणी म्हणत असेल की, ते युक्रेन-रशिया युद्धात तटस्थ आहेत, तर त्याचा अर्थ ते रशियाससमवेत आहेत. तटस्थता केवळ रशियाला साहाय्य करते. आक्रमणकर्ते आणि पीडित यांच्यात तटस्थता असू शकत नाही.
४. रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करून युद्ध रोखले जाऊ शकते. पुष्कळ लोकांचा असा युक्तीवाद आहे की, रशियावरील निर्बंधांचा कोणताही परिणाम झाला नाही. जर भारत, चीन, तुर्कीये आणि इतर मोठ्या देशांनी रशियावर निर्बंध लादले, तर पुतिन यांना युद्ध थांबवण्यास भाग पाडले जाईल. (याचा अर्थ ‘अमेरिका आणि युरोप यांनी लादलेले निर्बंध कुचकामी असतात’, असे म्हणायचे का ? – संपादक)
५. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांविषयी झेलेंस्की म्हणाले की, अमेरिकी धोरणे नेते पालटल्याने पालटत नाहीत. जो कुणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल, तो युक्रेनला पाठिंबा देत राहील. जर अमेरिकेचे धोरण पालटले, तर ते आमच्यासाठी कठीण होईल.
६. एकटा युरोप रशियाचा सामना करण्यास सक्षम आहे. हा एक शक्तीशाली महाद्वीप आहे. लोकसंख्येच्या संदर्भात तो रशियापेक्षा ५ पट मोठा आहे. जर युरोप एकसंध राहिला, तर तो फार शक्तीशाली आहे. युरोपचे ऐक्य टिकवून ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
ब्रिक्स शिखर परिषद अयशस्वी झाल्याचा दावा !
झेलेंस्की पुढे म्हणाले की, रशियातील ब्रिक्स परिषदेत अनेक देशांचे नेते उपस्थित होते; परंतु त्यांपैकी बहुतेक ते होते, ज्यांच्यावर पुतिन यांचा विश्वास नाही. सौदी अरेबियाला संघटनेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते; परंतु तो सहभागी झाला नाही. पुतिन यांना या शिखर परिषदेच्या माध्यमातून जगाचा मोठा भाग स्वतःच्या बाजूने आणायचा होता; पण ते तसे करू शकले नाहीत.
या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला होता. ‘शांततेच्या मार्गानेच समस्या सोडवल्या पाहिजेत. आगामी काळातही भारत सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.