हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक ! – बिपीन पाटणे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघ
‘हलाल’मुक्त दिवाळी : खेड येथे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन
खेड,२७ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे शासन नियंत्रित व्यवस्था वगळून उत्पादकांचा पैसा अन्य बिगर शासकीय यंत्रणेकडे जात असेल, तर यातून देशाला कोणता लाभ होणार आहे ? उत्पादक यांना कोणत्याही प्रमाणपत्रासाठी द्यावा लागणारा पैसा, हा देशाच्या तिजोरीतच जमा होणे आवश्यक आहे. त्यामुळे हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक असून केंद्र सरकारने याविषयी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. बिपीन पाटणे यांनी केले.
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने यावर्षी ‘हलाल’मुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी प्रबोधन मोहीम चालू करण्यात आली आहे. या निमित्ताने खेड येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
या वेळी खेड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद बुटाला, तालुका व्यापारी समिती सदस्य श्री. सचिन करवा, सर्वश्री उमेश संसारे, विश्वास पाटणे, प्रमोद पार्टे, मिनार चिखले, माजी नगरसेवक संजय मोदी यांना भेटून निवेदन आणि हस्तपत्रक देण्यात आले.
‘या विषयावर लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल’, असे श्री. सचिन करवा यांनी सांगितले. या प्रबोधन मोहिमेत धर्मजागरण तालुका संयोजक श्री. महेश सातपुते, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवाजी सालेकर, श्रीकांत धुमाळ आणि डॉ. हेमंत चाळके उपस्थित होते.