पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वीज ग्राहकांचे १६ सहस्र १४१ धनादेश ‘बाऊन्स’
पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वीज ग्राहकांनी गेल्या ६ महिन्यांत देयकापोटी दिलेले ४१ कोटी ८९ लाख रुपयांचे १६ सहस्र १४१ धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ झाले आहेत (वटले नाहीत). त्यामुळे या ग्राहकांना बँकेकडून प्रशासकीय शुल्कापोटी एक कोटी २१ लाख पाच सहस्र ७५० रुपये, तसेच १.२५ टक्के विलंब आकार भरावा लागला आहे. देयके भरण्यासाठी ‘ऑनलाइन’सह ‘ई.सी.एस्’, ‘एन्.ई.एफ्.टी.’, ‘आर्.टी.जी.एस्.’ असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत दरमहा सरासरी दोन सहस्र ६९० धनादेश ‘बाऊन्स’ होत आहेत. त्यामुळे लघुदाब ग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ पर्याय वापरून देयकांचा भरणा करावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले.
चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधित खात्यात रक्कम नसणे आदी कारणांमुळे धनादेश ‘बाऊन्स’ होतात. अनेक देयकांचा एकत्रित भरणा केल्यास प्रत्येक देयकापोटी दंडात्मक रक्कम आणि विलंब आकार लावला जातो. धनादेश दिल्यानंतर तो वटण्यासाठी साधारणतः ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच देयकाचा भरणा ग्राह्य धरला जातो. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात प्रती महिन्याला ४२ लाख १२ सहस्र (७९ टक्के) लघुदाब वीजग्राहक सरासरी एक सहस्र १९५ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा घरबसल्या करत आहेत.
महावितरणकडून लघुदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांना देयक घरबसल्या भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक देयकात ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मयदित) सूट मिळते. यासमवेतच थेट बँक खात्यातून दरमहा ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम’द्वारे (ई.सी.एस्.) आणि ५ सहस्र रुपयांवरील देयकापोटी ‘आर्.टी.जी.एस्.’ किंवा ‘एन्.ई.एफ्.टी.’द्वारे भरणा करण्याची सुविधा आहे. ग्राहकांनी याचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.