गोहत्या थांबवण्यास योगदान द्या !
दीपावली विशेष !
श्रीविष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील नंदा नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनु, म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गायीला ‘नंदा’चे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला ‘देवत्व’ प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला ‘वसुबारस’ असे म्हणतात. महाराष्ट्र शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. तरीही गोहत्या आणि गोमांस विक्री होतच आहे. तस्करांचा पूर्ण बंदोबस्त होत नाही. गोहत्या थांबत नाहीत, हे सध्याचे धगधगते सूत्र आहे.
गोहत्येच्या विरोधात लढतांना प्राण गमावलेले संत या देशात होऊन गेले, गोहत्या रोखण्यासाठी लढणार्या गोप्रेमींवर जीवघेणी आक्रमणे होतात; मात्र काही राज्यांत गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. गोमातेची पूजा करणारा हिंदु गोमातेची हत्या होतांना पहातो, यासारखे दुर्दैव कोणते ? ‘पिंक रिव्हॉल्युशन’च्या (गुलाबी क्रांतीच्या) गोंडस नावाखाली कित्येक पशूवधगृहे चालू आहेत. तिथे गोहत्या कधीतरी थांबतील का ? त्यासाठी प्रत्येक हिंदूने केवळ वसुबारस साजरी न करता खर्या अर्थाने गोहत्या रोखण्यासाठी योगदान दिल्यास राजरोस होणार्या गोहत्या थांबतील ! अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यातील बँगोर येथे ‘गोमाता अभयारण्य’ उभारण्यात आले आहे. ख्रिस्तीबहुल राष्ट्रात बहुसंख्य नागरिकांचा गायीचे मांस (बीफ) हा आहार असतांना तेथे गायींच्या पालनपोषणासाठी विशेष अभयारण्य चालू आहे.
एकीकडे अशी स्थिती असतांना हिंदूबहुल भारतात काय स्थिती आहे ? गोमाता हिंदूंना पूज्य आहे. वसुबारस, पोळा आदी सणांद्वारे तिच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त होते. ख्रिस्ती राष्ट्रांत गोअभयारण्ये होत असतांना भारतात गोमातांच्या रक्षणासाठी आंदोलने, निदर्शने करावी लागतात. ‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे जतन कसे करावे ?’, हे आता पाश्चात्त्यांकडून शिकायचे का ? भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गायीच्या हत्या रोखण्यासाठीही शासनाने कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे