कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे १० उमेदवार निवडून आणू ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना
कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्याच्या मुख्ममंत्र्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच देण्यात येणार असून येथे माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. श्री. सत्यजित कदम यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असून त्यांना महामंडळ देण्यात येणार आहे. गेल्या ५ वर्षांत कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राज्यात महायुतीची घौडदौड चालू असून कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे १० उमेदवार निवडून आणू, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, श्री. सत्यजित कदम, श्री. कृष्णराज महाडिक, तसेच शिवसेना आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘राजेश क्षीरसागर एक अनुभवी नेते असून ते निश्चित निवडून येतील याची मला निश्चिती आहे. एकीकडे महायुती चांगल्याप्रकारे उमेदवार देत असतांना काँग्रेसने मात्र बाहेरचा उमेदवार मतदारसंघावर लादला. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही.’’
श्री. कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘‘श्री. राजेश क्षीरसागर यांच्या पाठीमागे युवक-महिला यांचे पाठबळ उभे करू. या निवडणुकीच्या प्रक्रियेत मला बरेच शिकायला मिळाले. यापुढील काळात सामाजिक उपक्रम चालू ठेवून कोल्हापूर शहराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’