वीरबंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघकार्याचा मुंबईतील प्रेरणादायी इतिहास !
१. बाबाराव सावरकर यांच्या मार्गदर्शनामुळे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना करणे
भारतीय हिंदु समाजाची स्थिती गुलामगिरीच्या काळात बिकट झाली होती. स्वातंत्र्यासंबंधी उघडपणे विचार मांडणे, राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार करणे, संघटना उभारणे, व्यायामाचा प्रसार करणे; इतकेच नव्हे, तर छाती पुढे काढून ताठ चालणे, हा त्या काळात एक प्रकारचा गुन्हा समजला जात असे. दारिद्र्याच्या खाईत हा समाज तडफडत होता; पण तोंडाने ‘ब्र’सुद्धा काढण्याचे धाडस त्याच्यात नव्हते.
‘अभिनव भारत’ सशस्त्र क्रांतीच्या चळवळीने या सुमारास अखिल भारतीय स्वरूप धारण केले. विशेषतः कोलकाता (बंगाल)मध्ये पुष्कळ जोर दिसत होता. डॉ. केशव बळीराम हेगडेवार क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करत होते. वर्ष १९१० मध्ये ते शिक्षणासाठी कोलकाता येथे गेले. वर्ष १९११ मध्ये डॉ. नारायणराव सावरकर यांनीसुद्धा त्याच विद्यापिठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
‘हिंदूंची एखादी संघटना असावी’, असा विचार वर्ष १९१० पासून डॉ. हेडगेवार यांच्या मनात घोळत होता. श्री. बाबाराव सावरकर यांची अनेक वेळा भेट झाल्यावर त्या विचारांना अधिक चालना मिळाली. बाबारावांचे प्रभावी मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्यामुळे वर्ष १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे हिंदूंची एक संघटन संस्था चालू केली. १७ एप्रिल १९२६ या दिवशी त्या संस्थेला सर्वानुमते ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव देण्यात आले.
२. संघाच्या शाखेसाठी मुंबईत येणे
‘खेड्यातील हिंदु घटकापर्यंत संघाची विचारसरणी नेऊन पोचवली पाहिजे’, अशी त्यांची विचारधारा होती. ‘अखिल भारतीय दर्शन घडवणार्या आणि जागतिक कीर्तीच्या मुंबई शहरात संघाची शाखा असली पाहिजे’, ही त्यांच्या मनातील ओढ होती. या विचाराने पू. डॉ. हेडगेवार यांनी आपले परमस्नेही डॉ. नारायण दामोदर सावरकर आणि देशभक्त श्री. बाबाराव सावरकर यांच्याशी पत्रव्यवहार करून एप्रिल १९३१ मध्ये ते मुंबईत आले. डॉ. सावरकर यांनी गिरगावमधील सोमण इमारतीमध्ये आपल्या औषधालयात पू. डॉ. हेडगेवार यांची बैठकीची जागा निश्चित केली. शहरातील काही प्रमुख आणि परिचित व्यक्तींना भेटणे सोयीचे व्हावे; म्हणून ही योजना होती.
३. संघकार्याला साहाय्य करणार्यांची संख्या वाढणे आणि वर्ष १९३२ मध्ये संघाचे काम चालू करण्याचा निर्णय होणे
‘ज्या व्यक्ती संघकार्याला साहाय्य करतील, प्रत्यक्ष हातभार लावतील’, असे वाटत होते, अशा निवडक व्यक्तींना एकत्र अथवा त्यांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे आणण्याचे दायित्व श्री. बाबाराव सावरकर अन् डॉ. नारायणराव सावरकर यांनी घेतले. त्या दृष्टीने डॉ. सावरकर यांच्या औषधालयात अनेक बैठका झाल्या. प्रामुख्याने दादाराव नाईक, डॉ. मोतीराम बाळकृष्ण वेलकर, खानविलकर (खानसो) मोतीवाले, अनंत हरि गद्रे, का.ना. धारप, शिवरामपंत देवधर, आर्.एन्. शिंदे, लक्ष्मणशास्त्री ओगले, परशुरामपंत महाजन (‘माधवाश्रम’चे मालक), शिवरामपंत धोंड, राजाराम देसाई, गोविंदराव वर्तक उपस्थित होते. बाबारावांनी संघाची उपयुक्तता पटवून दिली. पू. डॉ. हेडगेवार यांनी संघाचा व्यापक दृष्टीकोन समजावून सांगितला. शंकानिरसन आणि चर्चा होऊन मुंबईत वर्ष १९३२ मध्ये काम चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
४. हिंदु-मुसलमान दंगलीमुळे १९३२ चे वर्ष वाया गेले !
जानेवारी १९३२ मध्ये सावरकर बंधूंना पुन्हा अटक झाली. १४ जानेवारी १९३२ या दिवसापासून मुंबईत हिंदु-मुसलमान यांच्यात मोठी दंगल झाली. काही काळ मुंबई शहर लष्कराच्या कह्यात देण्यात आले होते. ही दंगल दीर्घकाळ, म्हणजे ६ महिने चालली होती. सहा महिन्यांत रस्त्यावरील कचरासुद्धा झाडला गेलेला नव्हता. अशा प्रकारे १९३२ चे वर्ष वाया गेले.
५. वर्ष १९३३ मध्ये मुंबईत संघाच्या शाखेस आरंभ !
वर्ष १९३३ मध्ये पू. डॉ. हेडगेवार पुन्हा मुंबईत आले. सर्वांना भगव्या ध्वजासमोर उभे करून त्यांनी संघाची प्रतिज्ञा दिली. अशा प्रकारे वर्ष १९३३ मध्ये मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालू झाली.
६. डॉ. नारायणराव सावरकर यांच्याकडील दायित्व
डॉ. नारायणराव दामोदर सावरकर, दादाराव नाईक, सयाजीराव सिलम, माधव यशवंत सातवसे, कृष्णा वैद्य हे प्रारंभीचे स्वयंसेवक होते. बाबू तेलंग, विनू वालावलकर, राजा धारप, भालचंद्र पाटकर, सदानंद नाडकर्णी, दत्ता नाडकर्णी, राजा राजाध्यक्ष, जया वाघ, जया वरळीकर, गोविंदराव जोगळेकर, रामू गोखले, लघाटे, लिमये हे त्यानंतर आले. पू. डॉ. हेडगेवार १ महिना मुंबईत राहिले. मुंबई शाखा आणि संघ कार्य यांचे दायित्व डॉ. नारायणराव सावरकर यांच्यावर सोपवून ते नागपूर येथे परत गेले.
७. डॉ. सावरकर यांच्या प्रयत्नांमुळे संघाच्या शाखेसाठी सोयीस्कर मोकळे प्रशस्त पटांगण मिळणे
‘हिंदु महासभा, दंगलीतील साहाय्यकार्य, शुद्धीकरण आणि इतर सामाजिक कामे, तसेच संघाचे काम या सर्वांचा डॉ. सावरकर यांच्यावर बराच ताण पडेल’, याची डॉ. हेडगेवार यांना कल्पना होती. त्यामुळे नागपूर येथे पोचल्यावर त्यांनी श्री. गोपाळराव सदाशिव येरकुंटवार यांना ५ वर्षांसाठी प्रचारक म्हणून मुंबईत पाठवले. डॉ. सावरकर आणि इतर स्वयंसेवक यांच्या प्रयत्नांमुळे शाखेच्या ठिकाणची उपस्थिती चांगलीच वाढली होती; पण मोकळ्या वातावरणात शाखा भरवण्यासाठी सोयीस्कर असे मोकळे प्रशस्त पटांगण मिळत नव्हते. डॉ. सावरकर यांनी शिकस्तीचे प्रयत्न करून राजा नारायणलाल बन्सीलाल पित्ता या धनाढ्य व्यापार्याच्या साहाय्याने गिरगावातील मारवाडी विद्यालयाचे भव्य पटांगण मिळवले. मा. डॉ. सावरकरांच्या औषधालयात भरणारी संघाची शाखा ६ महिन्यांनंतर मारवाडी विद्यालयाच्या पटांगणावर ‘मारवाडी विद्यालय, मुख्य शाखा’ या नावाने भरू लागली.
८. तिसरी संघशाखा कामाठीपुरातील मरिअम्मा मंदिराच्या आवारात चालू होणे
डॉ. सावरकर मुंबईतील संघशाखांचे प्रमुख अधिकारी या नात्याने काम पहात होते. संघाच्या प्रचारकांचे सर्व प्रश्न त्यांनाच सोडवावे लागत होते. ते दायित्व त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक स्वीकारले होते. संघाकडे द्रव्य नसल्यामुळे प्रारंभी निर्माण होणारे बिकट प्रश्न त्यांनी स्वतःच सोडवणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्ष संघशाखेत येणे शक्य नसेल, तर त्यांच्याकडून परस्पर साहाय्याची अपेक्षा होती. संघटनेचे कार्य अविरत करता यावे आणि हिंदु संघटनेचे महान कार्य यशस्वी व्हावे, अशी मनापासून इच्छा असलेल्या अन् जाणीवपूर्वक सहानुभूती असणार्या व्यक्तीकडूनच आवश्यक तितक्या आर्थिक साहाय्याची अपेक्षा केलेली होती.
थोड्याच दिवसांत तिसरी संघशाखा कामाठीपुरातील मरिअम्मा मंदिराच्या आवारात चालू करण्यात आली. डॉ. सावरकर यांचे अगदी निकटचे लढवय्ये हिंदुत्वनिष्ठ स्नेही आणि काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रीयुत सयाजीराव सिलम अन् डॉ. भुसरथ यांच्या प्रयत्नांनी प्रभावी शाखा चालू झाली. जातीय दंगलीची सरहद्द संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही योजना होती.
९. संघकार्याला अधिक वेळ देण्यासाठी मुंबईच्या संघकार्याचे दायित्व दादाराव नाईक यांच्यावर सोपवणे
अशा प्रकारे मा. डॉ. नारायणराव सावरकर संघकार्याचे दायित्व अगदी योजनापूर्वक व्यवस्थितपणे पार पाडत होते. त्यांच्या कामाचा उरक वाखाणण्यासारखा होता. इच्छा असूनही संघकार्याला अधिक वेळ देता येत नाही, ही त्यांच्या मनातील खंत होती; म्हणून त्यांचे निकटवर्ती स्नेही दादाराव नाईक यांच्याशी विचारविनिमय करून त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आणि मुंबईच्या संघकार्याचे सर्व दायित्व दादाराव नाईक यांच्यावर सोपवले. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन दादांनी संघकार्याची धुरा आनंदाने स्वीकारली. त्यानंतरही डॉ. नारायणराव सावरकर हे संघाच्या वर्गाला पूर्ण गणवेशात उपस्थित रहात होते. हा त्यांच्या संघकार्याचा इतिहास !
लेखक : श्री. माधवराव सातवसे, मुंबई
(माहिती संकलन – श्री. शिरीष पाठक, नाशिक)