दीपावली : अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने प्रवास
आजपासून ‘दीपावली’चा प्रारंभ आणि ‘वसुबारस’ आहे. त्या निमित्ताने….
‘श्रावणातील व्रतवैकल्ये, भाद्रपदातील गणेशोत्सव आणि आश्विन मासातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आनंदाच्या फुलबाज्या उडू लागतात, कान दणाणून टाकणारे फटाके वाजू लागतात, उत्साहाचे तुषार उडू लागतात आणि नवे कपडे, नव्या वस्तूंच्या खरेदीची, खमंग फराळाच्या सिद्धतेची चक्रे फिरू लागतात. दीपावलीचा सण, म्हणजे वेगवेगळ्या उत्सवांचे जणू स्नेहसंमेलनच ! दीपावली हा प्रकाशाचा उत्सव ! भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण ‘दिवा किंवा ज्योत हे प्रकाशाचे प्रतीक आहे. प्रकाश काळोखावर, अंधःकारावर मात करतो. हा अंधःकार, म्हणजे नुसता अंधार नव्हे, तर अज्ञान, अंधविश्वास हीसुद्धा अंधःकाराचीच रूपे आहेत. या अज्ञान-अंधःकारावर मात करण्यासाठी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करावा’, हाच उद्देश दिवाळी या सणामागे आहे.
आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस !
गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस. वसु म्हणजे धन. बारस म्हणजे द्वादशी. भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी सवत्स धेनूची पूजा करतात. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते, असे म्हटले जाते. या दिवशी दिवसभर उपवास करून स्त्रिया संध्याकाळी गायीची पूजा करतात. गायीच्या पावलांवर पाणी घालून हळद-कुंकू आणि फुले वाहून गाय-वासराला औक्षण करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास आरंभ होतो. या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी, गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात. कित्येक घरांमध्ये दिवाळीच्या फराळातील करंज्या या दिवशी करून त्यांचा नैवेद्य गायीला दाखवतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे; म्हणून ही पूजा करतात. या दिवशीपासून घरोघरी आकाशकंदील लावतात. तो लावण्यापूर्वी त्याची पूजा करतात. समुद्रमंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातील ‘नंदा’ नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा करतात. उत्तरप्रदेशात या व्रताला ‘बछवाँछ’ असेही म्हणतात.
– डॉ. ज्योत्सना खरे
१. भगवंताच्या ज्ञानमार्गावर वाटचाल करून विवेकाची कास धरणे, म्हणजेच ज्ञानाची दिवाळी साजरे करणे !
संतश्रेष्ठ ज्ञानदेव म्हणतात –
मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ५४
अर्थ : मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्या वेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘समाजातील अविवेकाचा, अविचारांचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून, अविवेकाची काजळी झटकून, अज्ञानाचा अंधःकार नष्ट करतो आणि विवेकाचा नंदादीप प्रज्वलित करून ज्ञानाच्या प्रकाश मार्गाने मोक्षाची दिशा दाखवतो.’’ भगवंताने दाखवलेल्या अशा ज्ञानमार्गावर वाटचाल करून विवेकाची कास धरणे, म्हणजेच खर्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी साजरे करणे होय.
२. वसुबारस
आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’, असेही म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची, म्हणजे गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. ‘सवत्स धेनू’ हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसु म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो; म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! त्यातून वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो.
याच दिवशी गुरुद्वादशीही साजरी केली जाते. अखिल मानवजातीस ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून उपदेश करणार्या गुरूंच्या स्मरणार्थ वर्षातून गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा आणि गुरुद्वादशी या ३ तिथी साजर्या केल्या जातात. गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करणे, हेच त्यामागील उद्दिष्ट आहे. गुरुद्वादशीच्या निमित्ताने त्या दिवशी समाप्ती होईल, अशा पद्धतीने गुरुचरित्राचे सप्ताहपारायण करण्याची प्रथा आहे.
या दिवशी आकाशकंदिल लावून त्याची पूजा करून पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा. हा आकाशात झेपावणारा आकाशकंदिल देवदिवाळीपर्यंत लावावा.
दामोदराय नभसि तुलायां दोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।
अर्थ : आकाशातील श्रेष्ठ अशा परमेश्वराला, म्हणजेच दामोदराला (नारायणाला) मी हा ज्योतीसहित दीप अर्पण करतो. त्या अनंताला माझा नमस्कार असो.
३. धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यू येऊ नये; म्हणून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. सायंकाळी दक्षिणेकडे ज्योत करून पणती लावून तिची गंध, हळद-कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य या उपचारांनी पूजा करून
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे.
अशी प्रार्थना करून यमदीपदान करावे. या दिवशी दागिने, मौल्यवान वस्तू, विष्णु-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग या द्रव्यनिधी देवतांचेही पूजन केले जाते. धनत्रयोदशी हा दिवस विशेषतः व्यापारीवर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे नवीन वर्ष धनत्रयोदशीला चालू होते. या दिवशी समस्त लहान-मोठे व्यापारी त्यांच्या चोपड्यांची, म्हणजेच हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. मागील वर्षाचे हिशोब पूर्ण करून नव्या वर्षाच्या नव्या वह्यांची पूजा केली जाते. धनाची पूजा आणि यमदेवतेला दीपदान यातून व्यवहार अन् अध्यात्म यांचा सुरेख संगम साधला गेला आहे.
४. धन्वन्तरि जयंती
याच दिवशी धन्वन्तरि जयंतीही साजरी केली जाते. सर्व रोग नाश करून आरोग्य प्रदान करणार्या विविध औषधींचा निर्माता, लोकांचे रोग, म्हातारपण आणि मृत्यू यांविषयीची भीती नाहीशी करणार्या अन् मनुष्यच नव्हे, तर सर्व देव अन् असुर ज्याला नेहमी वंदन करतात, त्या आदिदेव धन्वन्तरिचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
ॐ धं धन्वन्तरये नमः ।
नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपङ्कजम् ।
लोके जरारुग्भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनाम् ।।
अर्थ : देवता आणि असुर ज्यांच्या चरणकमलांना वंदन करतात; जे जगातील वार्धक्य, व्याधी, भय आणि मृत्यू यांचा नाश करतात; अशा जगाचे पालक, तसेच विविध औषधींचे स्वामी असलेल्या भगवान धन्वन्तरींना मी नमस्कार करतो.
याच दिवशी आपल्या भारत देशात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, तसेच वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या वैद्य अन् डॉक्टर यांचा ‘धन्वन्तरि पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो.
५. नरकचतुर्दशी
आश्विन कृष्ण चतुर्दशीला येते ती नरकचतुर्दशी ! या दिवशी पहाटे सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने देवतांना आणि प्रजेला त्रास देणार्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला; म्हणून हा आनंदोत्सव सर्वत्र दिवे लावून साजरा केला. मृत्यूसमयी नरकासुराने श्रीकृष्णाकडे स्वतःची इच्छा प्रकट केली, ‘आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करील, त्याला नरकाची पीडा होणार नाही, तसेच माझा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा.’ श्रीकृष्णाने ‘तथास्तु’ म्हणून त्याची इच्छा पूर्ण केली. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या जीवनात नरक निर्माण करणार्या आळस, अस्वच्छता, राग, द्वेष, मत्सर, वैर, प्रमाद या अनिष्ट वृत्तींचा नाश करावा, हा त्यामागील खरा अर्थ आहे.
६. लक्ष्मी-कुबेर पूजन
आश्विन कृष्ण अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. लक्ष्मीची-धनाची पूजा करण्याचा हा दिवस ! आपल्या संस्कृतीत धनसंपत्तीला लक्ष्मी समजून तिला पूजनीय मानले आहे.
ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।। – श्रीसूक्त, ऋचा १३
अर्थ : हे अग्नीदेवते, तू माझ्या घरी स्वभावाने आर्द्र, कमलपुष्प हातात घेतलेल्या, पुष्टीरूप, पीतवर्ण, कमलपुष्पांची माला धारण करणार्या, चंद्राप्रमाणे शुभ्र कांती असलेल्या, स्वर्णमयी श्री लक्ष्मीदेवीचे आवाहन कर.
आर्थिक संकटे दूर होऊन सर्व प्रकारच्या धनधान्यांनी युक्त असे ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी श्री सुक्तातील हा श्लोक पठण करावा.
लक्ष्मी ही प्रयत्नांच्या ठिकाणी वास करते. जो उद्योगी, निर्भय, कुशल आणि सत्त्वगुण यांनी युक्त आहे. अशांच्या ठायी लक्ष्मीचा वास असतो; म्हणूनच प्रातःकाली आपल्या तळहातांचे दर्शन घेऊन लक्ष्मीदेवीचे स्मरण करावे.
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।
अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन घ्यावे.
लक्ष्मीदेवतेची धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी, अशी ८ रूपे आहेत. लक्ष्मीच्या अष्टरूपातील हे सर्व गुण आपण आपल्या अंगी बाणवावेत आणि सतत कार्यरत राहून लक्ष्मीला प्रसन्न ठेवावे, हा लक्ष्मीपूजनामागील खरा गर्भितार्थ आहे.
७. कुबेर
कुबेर हा वैवस्वत मन्वंतरातील विश्रवा ऋषींचा मुलगा ! ब्रह्मदेवाने याच्या सेवेला यक्ष, राक्षस, पुष्पक विमान आणि लंका दिली होती. वृद्धि अन् सिद्धि (ऋद्धि) याच्या शक्ती आहेत. अलका याची राजधानी आहे. हा सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा मालक असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर पूजनही केले जाते.
(क्रमशः)
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
(साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/?p=849053.html