Bandra Railway Station : वांद्रे (मुंबई) येथे गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी

  • ९ घायाळ 

  • २ गंभीर

  • चालत्या गाडीत चढल्याचा परिणाम !

मुंबई – वांद्रे येथे २७ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी होऊन ९ जण घायाळ, तर २ जण गंभीर घायाळ झाले. ही गाडी पूर्ण अनारक्षित असते. आठवड्यातून एकदा उत्तरप्रदेशात जाणार्‍या या गाडीत चढण्यासाठी, दिवाळी आणि छठपूजा या सणांसाठी मध्यप्रदेश अन् उत्तरप्रदेश येथे जाणार्‍या मुंबईतील प्रवाशांनी वांद्रे स्थानकावर पहाटे प्रचंड गर्दी केली होती. दीड सहस्र क्षमता असलेल्या या स्थानकावर अडीच सहस्र प्रवासी होते. पहाटे ५ वाजता सुटणारी ही गाडी स्थानकावर मध्यरात्री २.४५ वाजताच आली होती; मात्र गाडी स्थानकात येत असतांना प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. रेल्वे कर्मचार्‍यांनी घायाळ प्रवाशांना तात्काळ भाभा रुग्णालयात भरती केले. या घटनेनंतर विरोधकांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासन यांच्यावर टीका केली.

चेंगराचेंगरीमुळे प्रवाशांचे हाल

प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि गाडीत चढतांना काही प्रवासी स्थानकावर पडले. एकाची मांडी फाटली, तर एकाचा हात तुटला असल्याची माहिती मिळाली. चेंगराचेंगरीची ही घटना इतकी गंभीर होती की, घायाळ झालेल्या प्रवाशांची स्थिती फारच दयनीय झाली. स्थानकावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत होते.

चालत्या गाडीत प्रवाशांनी चढू नये ! – रेल्वे प्रशासन

या घटनेनंतर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यानी प्रवाशांना चालत्या गाडीत न चढण्याचे आवाहन केले, तसेच उत्तरप्रदेशात जाण्यासाठी सुटीच्या कालावधीसाठी २ सहस्र ५०० फेर्‍या ठेवण्यात आल्याने पुरेशा गाड्या उपलब्ध आहेत, असेही सांगितले.

गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या झालेल्या अपघातांची चौकशी रेल्वे विभागाने केली पाहिजे. रेल्वे विभागातील अधिकारी हे प्रवाशांसमवेत व्यवस्थित वागतही नाहीत. रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची सख्या वाढवण्याची मागणी केली, तरी ते देत नाहीत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाविषयी प्रश्‍न उपस्थित केले.