शौर्याचे धडे देणारी गड (किल्ले) बांधण्याची परंपरा जोपासा ! 

‘गड (किल्ला) बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे. या रूढीतून ‘हीनानि गुणानि दुषयति इति हिंदु ।’ (हीन अशा रज-तम गुणांचा नाश करणारा तो हिंदु) या व्याख्येनुसार अंतरात म्हणजे पिंडामध्ये हिंदवी स्वराज्याची (ईश्वरी राज्याची) स्थापना करणे हा व्यष्टी उद्देश युवा पिढीने स्वतःवर बिंबवणे आवश्यक आहे.

–  (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

गडावर हिंदूंची अस्मिता जागृत ठेवणारा भगवा ध्वज फडकवण्यास विसरू नका !

दिवाळी प्रत्येकासाठी वेगवेगळे वैशिष्ट्य घेऊन येते. मोठ्यांना वेध लागतात वाढीव वेतनाचे, नवीन खरेदीचे, गृहिणींना वेध लागतात आवराआवर, नातेवाइकांची ऊठबस, तसेच फराळ बनवण्याचे, ज्येष्ठांना वेध लागतात घराच्या सजावटीचे, तर बाळगोपाळांना वेध लागतात फटाके उडवणे, तसेच गड (किल्ला) बांधण्याचे ! अगदी शहरातसुद्धा अजूनही कुठेना कुठे मुलांनी गड  बांधलेले दिसतात. एवढेच काय, तर परदेशातही दिवाळीत गड बांधण्याची परंपरा भारतियांनी जपली आहे; पण मुलांचे हे गड उभारणीचे काम नेमके कधीपासून चालू झाले असावे ?

छत्रपती शिवाजी महाराजही स्वतः लहानपणी छोटे गड बांधत !

‘छत्रपती शिवाजी महाराजही स्वतः लहानपणी छोटे गड बांधत असत’, असे ‘शिवभारता’च्या सातव्या अध्यायात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी मातीच्या ढिगार्‍यांना ‘किल्ले’ म्हणणे याला मात्र कागदोपत्री पुरावा आहे. अर्थात् हे दिवाळीशी निगडित आहे, असे कुठेही नमूद नसले, तरी नंतरच्या काळात आरंभी पुण्याच्या आसपास आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू दिवाळीत गड बांधण्याची परंपरा पसरत जाऊन घराघरांत दिवाळीत ही गडबांधणी चालू झाली असावी. ‘आपल्या घरातील लहान मुलांना या निमित्ताने शौर्याचे धडे किंवा किमान त्याची आठवण देण्याचा यामागे हेतू असावा’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दिवाळीच का ? तर आपल्याकडे दसर्‍याला नव्या मोहिमा चालू होत, सीमोल्लंघन असे. त्यानंतर येणारा पहिला मोठा सण म्हणजे दीपावली ! याला ऐतिहासिक काही आधार नाही; पण हे अधिक सयुक्तिक आहे.

दिवाळीतील गड बांधण्याच्या स्पर्धांत मुलांना भाग घेण्यास प्रवृत्त करा !

हल्ली अनेक ठिकाणी गड बांधण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल, तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळेल. फार खर्चिक नसलेला हा खेळ इतिहास, छत्रपती महाराज आणि आपली मातृभूमी यांच्याशी नाळ जोडणारा आहे.

– कौस्तुभ कस्तुरे

(साभार : दैनिक ‘लोकमत’)