अभ्यंग स्नान !
दिवाळीत ‘अभ्यंग’ कशाने आणि का करावे ?
दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात् अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणे किंवा प्रचलित विज्ञापनांतील साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो; मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे सर्वाधिक हितावह ठरते.
‘अभ्यंगा’साठी बाजारातील सुगंधी तेल वापरू नका !
उटणे हेच ‘अभ्यंगा’साठी उत्तम आहे. बाजारात मिळणार्या उटण्याला पर्याय फार तर घरगुती सुगंधी तेलाचा आहे; मात्र त्याऐवजी रासायनिक प्रक्रिया केलेले सुगंधी तेल अजिबात वापरू नये; कारण त्यामध्ये ‘पॅराफीन’ अर्थात् ‘क्रूड ऑइल’ असते. त्यापेक्षा साधे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घ्या आणि त्यात भीमसेनी कापूर, घवला काचरी, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे घालून ते उकळून शरिराला ‘अभ्यंग’ करा किंवा नुसते तिळाचे तेल लावले तरी चालेल. अंगावरील तेलाचा अंश काढण्यासाठी नारळाच्या दुधात कालवलेले किंवा साधे उटणे लावून शरिरावर घासा.
अभ्यंगस्नानाचे लाभ
शरिराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत, यासाठी हे स्नान केले जाते. अभ्यंगस्नानामुळे रक्ताभिसरण चांगले होते. ‘आरोग्याची काळजी’ हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. ‘अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये, तर त्या दिवसापासून आरंभ करून ते वर्षभर प्रतिदिन करावे’, असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात.
उटणे लावून झाल्यावर साबण लावणे टाळावे !
उटणे लावून झाल्यावर साबण लावू नये. शास्त्रात ‘तिलामलककल्क’ असा उल्लेख आहे. म्हणजे काळे तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्याचा जो लगदा होतो, त्याने अंगाला चांगले मर्दन करावे. दिवाळीच्या सुमारास थंडी चालू होते. अशा वेळी त्वचा रुक्ष पडते; म्हणून काळे तीळ, आवळा, तिळाचे किंवा नारळाचे तेल, दूध यांचा पर्याय सुचवला आहे; कारण हे नैसर्गिक घटक त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
अभ्यंगस्नानामागील कथा
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला. तो एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून कारावासात ठेवले होते. त्याच्या वधानंतर श्रीकृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला, ‘जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करील, त्याला नरकाची बाधा होऊ नये.’ श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचवणारे पवित्र आणि मंगलस्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धत प्रचलित आहे. – श्री. सागर दाबके, पेण, रायगड (साभार : दैनिक ‘लोकमत’)