कोल्हापूर उत्तर भागाची उमेदवारी ज्याला घोषित होईल, त्यांचा प्रचार करणार ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप
कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – विधानसभेसाठी कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे गेल्या वेळेस मात्र भाजपला संधी मिळाली. ज्यात सत्यजित कदम यांना ८० सहस्र मतदान पडले. त्यामुळे यंदाही तो मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठांनी माझा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्याविषयी विचारणा केली. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी मुलासाठी हट्ट धरला, अशा बातम्या आल्या त्या चुकीच्या होत्या. कोल्हापूर उत्तर भागाची उमेदवारी अद्याप कुणालाही घोषित झालेली नाही. ज्याला घोषित होईल, त्यांचा प्रचार करणार, असे प्रतिपादन भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषेदत केले.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भागाच्या निवडणुकीच्या संदर्भात बर्याच अफवा पसरवल्या जात आहेत. कृष्णराज महाडिक यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होऊ नये; म्हणून हा खुलासा करत आहे. महायुतीकडे उत्तरसाठी ३ उमेदवार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे दहा उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. सर्वांत अधिक कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे. राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रचंड विकासकामे केली. क्रीडासंकुल, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी निधी यांच्यासह अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. त्यामुळे येथे त्यांना उमेदवारी घोषित झाल्यास आम्ही युती धर्म निभावू आणि त्यांचा प्रचार करू.’’
साखरेच्या दराविषयी समन्वयाची बैठक होऊन त्यात निर्णय होइल !
उसाला प्रतीटन ३७०० रुपये दर मिळावा; म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस परीषद घेऊन मागणी केली आहे. उसदरासाठी केंद्र सरकारचा ‘किमान मूल्य भावा’चा कायदा असून त्यानुसार साखर कारखानदार दर देतात. यंदा राजू शेट्टी यांची अधिकची मागणी आहे. त्यावर त्यांच्या समवेत समन्वयाची बैठक होऊन त्यात निर्णय होईल, असे महाडिक यांनी सांगितले.