महाराष्ट्रात रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यास बंदी !
सांगली, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायूप्रदूषण करणारे फटाके विक्री करणे आणि वाजवणे, तसेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवणे यांना बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्यांवर महापालिका आणि पोलीस यांचे लक्ष असेल. फटाके वाजवतांना वायूप्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घेण्याचेही महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिका शहरातील वायूप्रदूषण अल्प करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता दिवाळीतही मोठ्या प्रमाणामध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषण होण्याची भीती असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घोषित केला आहे.