गोमातेचे (देशी गायीचे) आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !
‘हिंदु संस्कृतीत गायीला ‘गोमातेचे’ स्थान दिले आहे. गोमाता मुळातच सात्त्विक आहे. तिचे दूध, गोमूत्र आणि गोमय (शेण) यांमध्येही सात्त्विकता असते. त्यामुळे गायीचे दूध, गोमूत्र आणि गोमय यांचा उपयोग यज्ञयाग अन् धार्मिक विधी यांमध्ये केला जातो. पूर्वी भारतातील प्रत्येक घरामध्ये गाय होती. प्रत्येक जण गोमातेचे दूध पीत असे. या दुधामुळे माणसे निरोगी, बुद्धीमान आणि बलशाली होती. गोमूत्र आणि गोमय यांचा वापर शेतीमध्ये होत असे. त्यामुळे झाडेझुडुपेही रोगमुक्त आणि सशक्त होती. आता मात्र परिस्थिती पालटली आहे. देशी गायीपेक्षा विदेशी गाय आणि म्हैस यांचे दूध वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन पुढे दिले आहे.
‘विदेशी गाय, म्हैस आणि देशी गाय यांच्याकडून वातावरणात प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी, अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पहाता येते. या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. या चाचणीतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने देशी गायीचे महत्त्व कळण्यासाठी केलेली ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ याद्वारे चाचणी !
वाचकांना सूचना : ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाची ओळखया लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. |
गोमातेचे (देशी गायीचे) आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणार्या संशोधनाची चित्रे !
१. चाचणीतील नोंदींचे विवेचन
या प्रयोगात चाचणीसाठी छायाचित्रे ठेवण्यापूर्वी ‘पी.आय.पी.’ तंत्रज्ञानाद्वारे वातावरणाचे छायाचित्र घेण्यात आले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर एकेक करून विदेशी गाय, म्हैस आणि देशी गाय यांची छायाचित्रे ठेवून त्यांची ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘विदेशी गाय, म्हैस आणि देशी गाय यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे समजले.
२. ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील (प्रभावळीतील) नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी काही महत्त्वाच्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
टीप – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.
अ. चाचणीसाठी छायाचित्रे ठेवण्यापूर्वी तेथील वातावरणात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ६२ टक्के होते.
आ. विदेशी गायीचे छायाचित्र ठेवल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ४७ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते पुष्कळ घटले आहे.
इ. म्हशीचे छायाचित्र ठेवल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ५८ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते घटले आहे.
ई. देशी गायीचे छायाचित्र ठेवल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ८६ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते पुष्कळ वाढले आहे.
३. निष्कर्ष
विदेशी गाय आणि म्हैस यांच्या छायाचित्रांमुळे वातावरणातील सात्त्विकता घटली. याउलट देशी गायीच्या छायाचित्रामुळे वातावरणातील सात्त्विकतेत पुष्कळ वाढ झाली. याचे कारण हे की, देशी गायीमध्ये ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता आहे, तशी विदेशी गाय आणि म्हैस यांच्यामध्ये नाही. विदेशी गाय आणि म्हैस हे तमोगुणी आहेत, तर देशी गाय सत्त्वगुणी आहे. त्यामुळे विदेशी गाय अन् म्हैस यांच्याकडून तमोगुणी स्पंदने, तर देशी गायीकडून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.
थोडक्यात देशी गायीकडून प्रक्षेपित होणार्या सात्त्विकतेमुळे वातावरण पुष्कळ चैतन्यमय बनते. ‘हिंदु धर्मात गायीला ‘गोमाता’ म्हणून का पूजतात ?’, तेही यातून लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.७.२०२४)