संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दिवाळी ही आनंदाचे प्रतीक म्हणून सांगणे; साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना करून संतांना अभिप्रेत असा दिवाळीचा आनंद नित्य उपभोगणे !

‘दिवाळी हा केवळ हिंदूंचा उत्सव नाही, तर तो उत्सवांचा शिरोमणी आहे. सर्व हिंदू या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात. संतांच्या जीवनात दिवाळीचा आनंद नित्य असतो. ‘संतांना अपेक्षित अशी दिवाळी म्हणजे काय ?’, याचे विवेचन येथे दिले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज

१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना अपेक्षित अशी दिवाळी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवनात निरंतर दिवाळी यावी, यासाठी सांगतात,

१ अ. सूर्यें अधिष्ठिली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची। दिवाळी करी।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी १२

अर्थ : ज्याप्रमाणे पूर्व दिशेला सूर्य उगवून जगाला प्रकाशाचे साम्राज्य देतो, त्याप्रमाणे भक्ताची वाणी श्रोत्यांना ब्रह्मज्ञानाची दिवाळी (रेलचेल) करते.

भावार्थ : ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर संपूर्ण जगाला प्रकाशाचे राज्य प्राप्त होते; तसेच वाचक-श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी प्राप्त होऊ दे.
येथे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांना ‘ज्ञानाची दिवाळी’ अभिप्रेत आहे. ज्ञान आणि प्रकाश एकरूप आहेत.

१ आ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात,

मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळीं।।
तैं योगियां पाहे दिवाळी। निरंतर।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ५४

अर्थ : मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्या वेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते.

भावार्थ : मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केले की, मनुष्याच्या जीवनात निरंतर, म्हणजे सतत दिवाळीच नांदते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना अभिप्रेत अशी दिवाळी अनुभवायला मिळणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वरीलप्रमाणे सांगितलेले ऐकले आणि वाचले, तरी ‘ते आचरणात कसे आणायचे ?’, हे मला ठाऊक नव्हते. माझ्यासारख्या अज्ञानी जिवाच्या जीवनात ज्ञानाचा दीप उजळावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म, साधना आणि सेवा या विषयांवर अभ्यासवर्ग घेतले, ग्रंथ लिहिले, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू केली. परिणामी माझ्यासारख्या साधकाच्या जीवनात ‘ज्ञानाची दिवाळी’ आली. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. त्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यास महत्त्व दिले आहे. साधकांनी तसे प्रयत्न केल्यामुळे साधकांच्या मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकार यांचा अंधार नष्ट होत आहे. परिणामी साधकांना जीवनात दिवाळीचा नित्य आनंद मिळत आहे.

२. संतांचा सत्संग म्हणजे दिवाळी !, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगणे

तिथीप्रमाणे वर्षातून ५ दिवस येणारी दिवाळी निश्चितच आनंद देणारी आहे; मात्र जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ज्या दिवशी साधूसंत आपल्या घरी येतील, ती तिथी कोणतीही असली, तरी त्या दिवशी आम्हाला होणारा आनंद हा दिवाळी-दसर्‍यासारखा असतो.’

संतांच्या सत्संगाची दिवाळीशी तुलना करतांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात,

अ. ‘साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा।’
भावार्थ : ‘साधूसंतांचे घरी आगमन होणे, म्हणजे जणू दिवाळी आणि दसराच !’

आ. ‘दसरा दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील।।’
भावार्थ : ‘मला अन्य संतांचा सहवास मिळणे, हाच खरा दसरा आणि दिवाळी आहे.’

इ. ‘तुका म्हणे त्याचे घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण।।’
भावार्थ : ‘संतांनी जे विचार दिले, ते अनुभवायला मिळणे, ही माझ्या (भक्ताच्या) जीवनातील खरी दिवाळी आणि दसरा आहे.’

पू. शिवाजी वटकर

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने संतांचा सत्संग मिळाल्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना अभिप्रेत अशी दिवाळी नित्य अनुभवणे : माझ्या परम भाग्याने माझ्या जीवनात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ३४ वर्षांपूर्वी आले आणि माझ्या जीवनात आनंदाच्या दिवाळीची पहाट झाली. वर्ष १९८९ पासून १० वर्षे मला परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग प्रतिदिन मिळाला, तसेच प.पू. भक्तराज महाराज, प.पू. जोशीबाबा, प.पू. काणे महाराज इत्यादी संतांचा सत्संग पुष्कळ दिवस मिळाला. मागील १४ वर्षांपासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहे. त्यामुळे मला प.पू. पांडे महाराज, आश्रमाला भेट देणारे समाजातील संत, सनातनचे सद्गुरु आणि संत यांचा सत्संग सतत मिळत आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांना अपेक्षित अशी सत्संगरूपी दिवाळी मी नित्य अनुभवत आहे.

३. सनातन संस्थेत आल्यावर खर्‍या दिवाळीचा आनंद अनुभवायला मिळणे

माझ्या भाग्याने काही वर्षे मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या समवेत दिवाळीला होतो आणि आनंद अनुभवला. गुरुदेवांच्या समवेत वर्ष १९९४ मध्ये मी सहकुटुंब इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात दिवाळीसाठी गेलो होतो. तेव्हा मला दिवाळीचा आनंदोत्सव लाभला. प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत देवदिवाळीला नाशिक येथे होतो. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर हे माझ्या हृदय सिंहासनी विराजमान असल्यामुळे मला नित्य दिवाळी अनुभवायला मिळत आहे. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणावेसे वाटते,

साधकांचे गुरु परम पूज्य (टीप) असती आनंददायी।
साधकांचा भाव असे परम पूज्यांच्या चरणी।
साधक साधना करूनी रामराज्य अनुभवती।
रामराज्यात असे साधकांना नित्य दिवाळी।।’

टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.

– (पू.) श्री. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल, (२०.४.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक