Rashid Alvi : (म्हणे) ‘हिंदूंनी बेकायदेशीर मशिदींच्या विरोधात आवाज उठवला, तर गृहयुद्ध होईल !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांचे विधान !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

नवी देहली – उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांसह इतर राज्यांमध्ये बेकायदेशीर मशिदींच्या विरोधात हिंदु संघटनांकडून निदर्शने केली जात आहेत. देशभरातील हिंदु संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यासह अशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या वाढत्या निषेधामुळे चिंता व्यक्त केली जात आहे, जी विशेषतः भाजपशासित राज्यांमध्ये दिसून येत आहे. (भाजप सरकारच्या काळात बेकायदेशीर मशिदींना विरोध केला जाण्याची शक्ती कायदाप्रेमी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या सत्ताकाळात ते धाडस करता येत नव्हते, हेच अल्वी मान्य करत आहेत ! – संपादक) मशिदींविषयी वाढता द्वेष पाहून मी दु:खी आणि काळजीत आहे. मशिदी पाडण्याची मागणी सर्वत्र होत आहे. एकीकडे इस्लामी देशांमध्ये मंदिरे बांधली जात असतांना दुसरीकडे भारतात मशिदींना लक्ष्य केले जात आहे. (इस्लामी देशांत मंदिरे बांधली जात असतांना भारतात धर्मांध मुसलमानांकडून मंदिरांवर आक्रमणे केली जातात, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीच्या ठिकाणी आक्रमणे केली जातात, त्याविषयी अल्वी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक) ही परिस्थिती फार काळ टिकू शकत नाही, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा घटना देशाला गृहयुद्धाकडे घेऊन जात आहेत, असे विधान काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी ‘आय.ए.एन्.एस्. (इंडो-एशियन न्यूज सर्व्हिस) या वृत्तसंस्थेशी बोलतांना केले.

राशिद अल्वी पुढे म्हणाले की, आज तुमच्याकडे (भाजपकडे) सत्ता आणि शक्ती  आहे; पण सरकार कायम टिकत नाही. त्यामुळे मशिदी आणि मंदिर या दोन्हींची सुरक्षा आवश्यक आहे. सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे, हे सरकारचे दायित्व आहे.

संपादकीय भूमिका

  • ही अल्वी यांनी हिंदूंना दिलेली एकाअर्थी धमकीच आहे. ‘आम्ही बेकायदेशीर मशिदी बांधल्या, तरी तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आणि उठवला, तर गृहयुद्ध होईल’, असेच त्यांना म्हणायचे आहे, हे लक्षात घ्या !
  • बेकायदेशीर असणार्‍या बांधकामांच्या विरोधात उभे रहाण्याऐवजी धर्माच्या आधारे त्याला पाठीशी घालून वर धमकी देणार्‍या अशांना सरकारने कारागृहातच टाकले पाहिजे !