BBC on Trial : ‘बीबीसी’चा बुरखा फाडणारी डॉक्युमेंट्री ‘बीबीसी ऑन ट्रायल’ प्रसारित !

‘सनातन प्रभात’चे मानले विशेष आभार !

(डॉक्युमेंट्री म्हणजे माहितीपट !)

जयपूर (राजस्थान) – भारत आणि हिंदूविरोधी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीचा बुरखा फाडणारी ‘बीबीसी ऑन ट्रायल’ नावाची ‘डॉक्युमेंट्री’ २५ ऑक्टोबरच्या रात्री ‘रिक्लेमिंग भारत’ या ३ दिवसांच्या जागतिक कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन येथील ‘द जयपूर डायलॉग्ज’ या संस्थेने केले आहे. विविध सुप्रसिद्ध आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ ऑनलाईन माध्यमांवरून तिचे प्रसारण करण्यात आले. डॉक्युमेंट्रीचे निर्माते असलेली संघटना ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’ हिने डॉक्युमेंट्रीच्या प्रसारार्थ सहकार्य करणारे ‘द जयपूर डायलॉग्ज’, ‘स्ट्रिंग रिव्हील्स’, ‘प्राच्यम्’, ‘स्वराज्य माग’ आणि ‘सनातन प्रभात’ यांचे विशेष आभार मानले आहेत.

ही डॉक्युमेंट्री ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ आणि ‘प्राच्यम्’ यांच्या ‘ओटीटी’ समवेतच ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’च्या य ूट्यूब चॅनलवरही प्रसारित करण्यात आली आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’चे अध्यक्ष पंडित सतीश शर्मा यांनी केले असून ‘स्ट्रिंग रिव्हील्स’चे प्रमुख विनोद कुमार यांनी व्हिडिओचे संकलन केले आहे. भारतासह युनायटेड किंगडम, अमेरिका, तसेच न्यूझीलँड येथील अनेक हिंदूंनी या डॉक्युमेंट्रीच्या निर्मितीसाठी साहाय्य केले आहे.

या ‘डॉक्युमेंट्री’तून मांडण्यात आलेला भाग !

१. ही डॉक्युमेंट्री एकूण १ तास ८ मिनिटांची असून तिचे ५ भाग (चॅप्टर) बनवण्यात आले आहेत. प्रत्येक भागातून बीबीसीचा केवळ हिंदु आणि भारत द्वेष्टाच चहरा नाही, तर तिने इराण, लिबिया, इराक आदी देशांच्या हिताच्या विरोधात जाऊन तेथील सरकारे कशा प्रकारे उलथवून लावली, बीबीसीमधील निष्ठावंत संपादक आणि पत्रकार यांच्यावर बीबीसीनेच कशा प्रकारे अन्याय केला, बीबीसीचे अनेक कर्मचारी लैंगिक गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे अनेक पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई केली नाही आदी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दाखवण्यात आली आहे.

२. बीबीसीने भारतासंदर्भात निराधार आणि वास्तवाचे भान न ठेवता केलेल्या वृत्तांकनाचे अनेक दाखवले यात देण्यात आले आहेत. उदा. २६/११ ला जिहादी आतंकवाद्यांच्या मुंबईवरील आक्रमणात आक्रमणकर्त्यांना ‘आतंकवादी’ न संबोधता ‘बंदुकधारी’ संबोधणे आदी.

३. ‘नव वसाहतवादा’चे सत्य स्वरूप विशद करतांना जेथे-जेथे ब्रिटनच्या वसाहती होत्या, तेथे-तेथे ब्रिटीश गेल्यानंतर त्या देशांची स्थिती किती दीन झाली, हे दाखवण्याचा एकांगी प्रयत्न बीबीसीकडून करण्यात आला.

४. बीबीसीचा उल्लेख वर्ष १९४२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी ‘ब्लफ अँड ब्लस्टर कॉर्पोरेशन’ असा केला असल्याचे यातून सांगण्यात आले आहे. यासह डॉक्युमेंट्रीमधून ठिकठिकाणी ‘सामूहिक विनाशाचे शस्त्र म्हणजे बीबीसी’, ‘वृत्तसेवा’ या वेशातील जागतिक युद्धाचे एक गुप्त साधन म्हणजे बीबीसी‘, ‘दुटप्पी भूमिका नाही, तर अधिकार गाजवणारी बीबीसी’, ‘बातम्यांचे युद्ध म्हणून वापर करणारी बीबीसी’ अशा प्रकारे बीबीसीचे यथार्थ चित्रण करण्यात आले आहे.

५. वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत बीबीसी भारतात तब्बल १७३ टक्क्यांनी वाढली, तर याच कालावधीत तिची जागतिक वाढ केवळ ३५ टक्के राहिली. वर्ष २०२० मध्ये विदेशी हस्तकांच्या माध्यमांतून देहलीतील भारतद्वेष्टे शेतकरी आंदोलन झाल्याचे आपण विसरता कामा नये.

ही डॉक्युमेंट्री पहाण्यासाठी पुढील मार्गिकेला भेट द्या ! : bbcontrial.com