सांगली जिल्ह्यात सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जयंत पाटील, विक्रम सावंत यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

रोहित पाटील, सुहास बाबर, संग्राम सिंह देशमुख निशिकांत पाटील यांचा समावेश !

प्रतीकात्मक चित्र

सांगली, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृत योग साधत जिल्ह्यातील १८ उमेदवारांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत यांच्यासह रोहित पाटील, संग्राम सिंह देशमुख, निशिकांत पाटील, सुहास बाबर, प्रकाश जमदाडे यांचा समावेश आहे. अन्य प्रमुख उमेदवार २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी आवेदन प्रविष्ट करणार आहेत.

काही मतदारसंघांत उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. मंत्री सुरेश खाडे यांनी साधेपणाने आवेदन प्रविष्ट केले. ते २९ ऑक्टोबर या दिवशी शक्तीप्रदर्शन करत आणखी १ आवेदन प्रविष्ट करणार आहेत. जयंत पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आवेदन प्रविष्ट केले. जतमधून काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढून आवेदन प्रविष्ट केले. तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून रोहित पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत आवेदन प्रविष्ट केले.