कोकणात अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करा ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री
मालवण – कोकणात चालू असलेल्या अतीवृष्टीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा अन् काजू पिकांसह भातशेतीची मोठी हानी झाली आहे. या हानीचे तात्काळ पंचनामे करून सरकारच्या वतीने शेतकर्यांना साहाय्य करण्यात यावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी राज्यपालांकडे केली आहे.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. शेतकर्यांचा मुख्य आर्थिक स्रोत त्यावरच अवलंबून आहे. भात पीक सिद्ध झालेले असतांना कापणीच्या हंगामात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पडलेल्या पावसामुळे शेती पूर्णत: भूईसपाट झाली आहे. आंबा आणि काजू यांच्या उत्पादनांवरही मोठ्या प्रमाणात या अतीवृष्टीचा परिणाम होणार आहे. कोकणात भाताची शेती करणार्या शेतकर्यांचे प्रमाण मोठे असल्यामुळे त्यांना आर्थिक साहाय्य मिळणे आवश्यक आहे, तसेच अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या लहान शेतकर्यांना विशेष आर्थिक साहाय्य (पॅकेज) देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांच्याकडेही करणार आहे, असे माजी मंत्री प्रभु यांनी सांगितले.