विरोधकांसाठी लाडक्या बहिणीच पुरेशा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नागपूर येथे फडणवीस यांच्याकडून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !
नागपूर – नागपूर आणि विदर्भ येथे आम्ही परिवर्तन घडवून दाखवले. नागपूर शहरातील विकास पाहिला, तर पालट दिसून येतो. त्यामुळे माझ्यापेक्षा माझे काम बोलत आहे. विरोधकांविषयी बोलायची आवश्यकता नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. त्यांच्यासाठी केवळ आमच्या लाडक्या बहिणी पुरेशा आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले. उमेदवारी आवेदन प्रविष्ट करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीप्रदर्शन केले. या वेळी राज्यातील भाजपचे सर्व नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, नागपूरकरांशी मला अधिक बोलण्याची आवश्यकता नाही; कारण नागपूर शहरामध्ये आमचे काम बोलते. नागपूर येथील जनतेच्या आशीर्वादामुळेच मी राज्यासाठी काम करू शकलो. राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. मुलींसाठी विनामूल्य शिक्षण असेल, शेतकर्यांसाठी विनामूल्य वीज असेल. दीन, दलित, गरीब, आदिवासी, शेतकरी सर्वांसाठी आम्ही केलेले काम बोलत आहे.