अकलूज (सोलापूर) येथे गोवंशीय जनावरांचे ५५ किलो मांस आणि १९ जर्सी गोवंशीय जनावरे जप्त !

अकलूज (जिल्हा ग्रामीण सोलापूर), २५ ऑक्टोबर (वार्ता.) – अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षक अक्षय कांचन, ऋषिकेश दसवडकर, अभिषेक मुळे, नीलेश अनपूर आणि वैभव खरात यांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते. गोरक्षकांना पाहून ते पळून गेले. जवळच असलेल्या चिराक्षली बाबा दर्ग्याजवळ खिडकीला ७ जर्सी जनावरे, तसेच एका शेडमध्ये २ जर्सी जनावरे कत्तलीसाठी बांधलेली होती. ही जनावरे अदिल कुरेशी, नजीर सौदागर, अजय मोरे यांची होती. गोरक्षकांनी ३० किलो जनावरांचे मांस आणि ९ जर्शी गायी पोलिसांच्या कह्यात दिल्या.

अकलुज येथील व्हनमाने प्लॉट, कुरेशी गल्ली येथे अजित मोरे यांच्या घराजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल चालू आहे, अशी बातमी पोलिसांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेल्यावर कबीर मोरे आणि इतर ३ जण जनावरांची हत्या करत होते. पोलिसांना बघून जनावरांचे मांस तेथेच सोडून ते पळून गेले. वरील दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५५ किलो गोवंशीय जनावरांचे मांस आणि १९ जर्सी गोवंशीय जनावरे मिळाली आहेत. या प्रकरणी श्रीराम पोरे यांनी कबीर मोरे, अदिल कुरेशी, नजीर सौदागर, अजय मोरे आणि अन्य ५ अनोळखी लोकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

गोरक्षण केल्यामुळे कसायांचे गोरक्षकांवर आक्रमण !

गोरक्षक नीलेश अनपूर तसेच, त्यांचे गोरक्षक सहकारी ऋषिकेश दसवडकर, अभिषेक मुळे, वैभव खरात, अक्षय कांचन हे अकलूजवरून गोरक्षणाची कारवाई करून २२ ऑक्टोबर या दिवशी परत येत होते. इंदापूर येथे आले असता त्यांच्या मागून एका अनोळखी इनोव्हा गाडीने ‘ओव्हरटेक’ करून त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. त्या गाडीतील व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या दिशेने दगड आणि काचेची बाटली फेकून मारली. या अपघातात नीलेश अनपूर यांच्या डाव्या पायाला मुका मार लागला असून अक्षय कांचन यांच्या ओठाला किरकोळ दुखापत झाली आहे. अजय मोरे आणि त्यांच्या वाहनचालकाने हे आक्रमण केले असल्याचे गोरक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गोरक्षक नीलेश अनपूर यांनी अजय मोरे यांच्या विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.