बाल न्यायालयाने दोषीला २० वर्षांचा कारावास आणि साडेनऊ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
१३ मासांच्या बालिकेवर बलात्कार केल्याचे प्रकरण
पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – पणजी बाल न्यायालयाने बेतोडा, फोंडा येथील संशयित विजय कटप्पा बिरादर (वय २९ वर्षे) याला एका १३ मासांच्या बालिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी २० वर्षांचा सक्त कारावास आणि साडेनऊ लाख रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. ३० ऑक्टोबर २०१५ या दिवशी आशेवाडा, बेतोडा येथे ही घटना घडली होती आणि त्या वेळी संशयिताचे वय १९ वर्षे होते. बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बालिकेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर संशयिताला कह्यात घेण्यात आले होते. संशयिताच्या विरोधात भारतीय दंड संहितेची विविध कलमे, गोवा बाल कायदा आणि ‘पोक्सो’ आदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचे अन्वेषण फोंडा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्याचे पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी केले होते.