मंदिरांवरील आघातांच्या विरोधात दबावगट निर्माण करण्याचा निर्धार !

कोल्हापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची बैठक !

डावीकडून श्री. प्रसाद कुलकर्णी, मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, श्री. किरण दुसे आणि श्री. प्रमोद सावंत

कोल्हापूर – मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम लक्षात येत आहेत. काही मंदिरांच्या जागा वक्फ कायद्यान्वये बळकावल्या जात आहेत. मंदिरांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात कुणीही ठामपणे कृती करतांना दिसत नाही. मंदिरांची भूमी बळकावणे, तसेच विविध आघात यांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. लक्ष्मी-नारायण मंदिरात झालेल्या या बैठकीसाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत हिंदु धर्म अन् मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्रितपणे कृती करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्वश्री प्रमोद सावंत, प्रसाद कुलकर्णी, अभिजित पाटील यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीसाठी उपस्थित विविध मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी आणि मान्यवर
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत मनोगत व्यक्त करतांना श्री. अभिजित पाटील

बैठकीत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत महिन्यातून एकदा मंदिर विश्वस्तांची बैठक घेणे, मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, सर्व मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांच्या तालुक्यांच्या भागात मंदिर महासंघाच्या वतीने बैठक घेणे, मंदिरातील फलकांवर जागृतीपर लिखाण करणे असे उपक्रमही ठरवण्यात आले. या प्रसंगी विविध विश्वस्तांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीसाठी उपस्थित विविध मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी, मान्यवर

गीता मंदिराचे अध्यक्ष जमनादास पटेल (वय ८३ वर्ष) यांचे गुडघ्याचे शस्त्रकर्म झालेले असतांना ते उपस्थित होते. लक्ष्मीनारायण मंदिराचे राजेंद्र शर्मा यांनी बैठकीसाठी मंदिर उपलब्ध करून दिले होते.