साधिकेने ऋषितुल्य असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांचा अनुभवलेला चैतन्यदायी सत्संग !
१. ‘पू. दातेआजींच्या खोलीत प्रवेश करताच मला त्यांच्या चेहर्यावर एक दिव्य तेज दिसले.
२. पू. आजी मागील पावणेतीन मासांपासून एकाच स्थितीत बेशुद्ध आहेत, तरी ‘त्या आजारी आहेत’, असे वाटत नव्हते. ‘त्या सहज झोपल्या आहेत’, असेच वाटत होते.
३. सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) या पू. आजींच्या स्थितीबद्दल सांगत होत्या. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ऋषितुल्य महान संत स्वतःच्या मनासह स्थूल शरीरही समष्टी कार्यासाठी उपयोगी पडावे’, असा विचार करतात.’
४. सौ. ज्योतीकाकूंकडून रुग्णावस्थेत असणार्या पू. आजींची स्तुती ऐकतांना माझे मन कृतज्ञतेने भरून आले आणि माझ्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले.
५. ‘एखाद्या आजारी व्यक्तीला पहायला गेल्यावर तेथून कधी एकदाचे बाहेर पडतो’, असे आपल्याला वाटते; पण ‘पू. आजींच्या खोलीतून बाहेर जावे’, असे मला वाटत नव्हते. ‘ऋषितुल्य अशा पू. आजींच्या खोलीतच राहूया. त्यांच्या खोलीत बसून ध्यान करूया आणि तेथील चैतन्य ग्रहण करत राहूया’, असे मला वाटत होते.
६. ‘पू. आजींची खोली, म्हणजे एक दिव्य अलौकिक पोकळी आहे आणि ती प्रकाशाने भरलेली आहे’, असे मला दिसले.
७. पू. आजींच्या नाभीतून (मणिपूरचक्रातून) मला सूक्ष्मातून ‘श्री नारायण, श्री नारायण’, असा नामजप ऐकू येत होता.
८. मला सकाळपासून पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. रात्री ८.१५ ते ८.३० या वेळेत मी पू. आजींच्या खोलीत गेले होते. त्या १५ मिनिटांत माझा त्रास न्यून होऊन मला हलकेपणा जाणवू लागला, तसेच माझा उत्साह वाढून मला पुष्कळ आनंद वाटू लागला.
९. ‘रात्रीचा दिवस करून न हरता चिकाटीने त्रासाशी लढले पाहिजे’, हे मला पू. आजींकडून शिकायला मिळाले.’
– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |