Pujya (Advocate) Ravindra Ghosh Appeals : जगाने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा !

  • ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांचे व्हिडिओद्वारे आवाहन

  • हिंदूंवरील अत्याचारांच्या ३ सहस्र ३६ प्रकरणांचे केले प्रत्यक्ष अन्वेषण !

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर सतत आक्रमणे केली जातात, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. अल्पसंख्यांक हिंदूंनी वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी पुष्कळ मोठे बलीदान दिले आहे. हिंदूंवरील आक्रमणांची आणि अत्याचारांची ३ सहस्र ३६ प्रकरणे घडल्याचा अहवाल आमच्याकडे उपलब्ध आहे; परंतु शेख हसीना असोत, खालिदा जिया असोत कि अन्य कुणी, कुठल्याच सरकारने हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी कुठलीच पावले उचलली नाहीत. प्रत्येकाच्या राजवटीत हिंदूंवर अत्याचारच झाले. जागतिक मानवसमुहाने बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी केले. त्यांनी यासंदर्भात प्रसारित केलेला व्हिडिओ ‘सनातन प्रभात’ला पाठवला आहे.

पू. घोष पुढे म्हणाले की,

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

१. हिंदूंवरील अत्याचारांचा आम्ही निषेध करत आलो आहोत.

२. आम्ही वेळोवेळी बांगलादेशातील सरकारांना अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. हे रोखले नाही, तर बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद होईल.

बांगलादेशातील हिंदूंचे जीवन आणि त्यांची मालमत्ता यांच्या रक्षणासाठी आमचा लढा !

पू. घोष म्हणाले की, बांगलादेशातील मानवाधिकारांच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारून आम्ही देशात अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार, हत्या, धमक्या, सामूहिक बलात्कार इत्यादी घटनांचे प्रत्यक्षात जाऊन अन्वेषण (ग्राऊंड झिरो इन्व्हेस्टिगेशन) केले आहे. बांगलादेशात हिंदूंचे जीवन आणि त्यांची मालमत्ता यांच्या रक्षणासाठी आम्ही लढा देत आहेत. आम्ही बांगलादेशातील ढाकासहित, चितगाव, दिनाजपूर, रामपूर इत्यादी जिल्ह्यांना भेटी देऊन तेथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची चौकशी केली.