मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी भारताला भेट का दिली ?

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू हे ६ ते १० ऑक्टोबर  २०२४ या कालावधीत भारत दौर्‍यावर देहली येथे आले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये मालदीवमधील ‘इंडिया आऊट’ (भारताला हाकलवून लावा !) या मोहिमेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेल्याने ही भेट महत्त्वाची होती. मुइज्जू भारत दौर्‍यावर नक्की कोणत्या कारणासाठी आले ? या दौर्‍यामागचा त्यांचा उद्देश काय होता ? याविषयीचे विश्लेषण करणारा हा लेख…

१. महंमद मुइज्जू यांनी भारत दौरा का केला ?

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

५ मासांपूर्वी मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी मुइज्जू भारतात आले होते; मात्र त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय राज्य दौरा होता. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ‘फर्स्ट लेडी’ (मालदीवच्या प्रथम महिला) साजिदा महंमद यांच्यासमवेत भारतात आलेल्या मुइज्जू यांचे राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांनी नवी देहलीतील ‘हैदराबाद हाऊस’मध्ये पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा केली. यानंतर ते व्यावसायिक कार्यक्रमांसाठी  मुंबई आणि बेंगळुरू येथेही गेले.

मुइज्जू म्हणाले, ‘‘मालदीवचा आर्थिक भार न्यून करणे, हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. भारताला आमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि आमचा सर्वांत मोठा ‘विकास भागीदार’ म्हणून आमचा भार न्यून करण्यासाठी आमच्यासमोर असलेल्या आव्हानांवर चांगले पर्याय अन् उपाय शोधण्यासाठी ते नेहमीच सिद्ध आहेत.’ मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चेच्या वेळी चलन अदलाबदल करण्याची आणि कर्जाची विनंती केली. भारताने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मालदीवला आर्थिक साहाय्य देऊ केले आहे. मालदीवच्या परकीय चलनाचा साठा ४४ कोटी डॉलर्सपर्यंत घसरल्याने हा देश कर्जात बुडेल, असे चित्र आहे.

मालदीव हा भारताचा हिंद महासागर प्रदेशातील प्रमुख शेजारी देश आहे आणि पंतप्रधानांच्या ‘सागर’ योजना (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन – हिंद महासागराशी संलग्न असलेल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास योजना) आणि भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट पॉलिसी’चा (प्रथम शेजारी देश धोरणाचा) भाग आहे. मुइज्जू यांच्या दौर्‍यातील चर्चा ही ‘द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे आणि दोन राष्ट्रांमधील दीर्घकालीन संबंध वाढवणे’, यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केली गेली.

२. मालदीवने केलेल्या भारतविरोधी कारवाया

मुइज्जू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेला. भारताने १० मे २०२४ च्या अंतिम मुदतीपूर्वी या देशातून आपल्या ८० हून अधिक लष्करी कर्मचार्‍यांना परत जाण्यास सांगितले. मालदीवला भेट दिलेली २ हेलिकॉप्टर्स आणि ‘डॉर्नियर’ विमाने भारतीय सैन्याद्वारे चालवली जायची अन् त्यांची देखभाल केली जायची. भारतीय सैन्याच्या मुद्याव्यतिरिक्त भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ‘लक्षद्वीप बेटांवर पर्यटनाला जा’, या सूत्राच्या प्रचाराला उत्तर देतांना मालदीवच्या काही मंत्र्यांनी मोदींविषयी अपमानास्पद टिपणी केली होती. त्यामुळे मालदीवशी असलेल्या भारताच्या संबंधांना आणखी तडा गेला. नंतर मुइज्जू सरकारने २ कनिष्ठ मंत्र्यांना निलंबित करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

भारतात सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी ‘मालदीववर बहिष्कार घाला !’, अशी मोहीम चालू केली. भारतातील वलयांकित व्यक्तींनीही स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला. या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये जाणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मालदीवसाठी भारत हा पर्यटनाचा सर्वांत मोठा स्रोत आहे. ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोचला.

३. चीनमुळे उन्मत्त झालेल्या मुइज्जू यांचे वागणे आणि ‘मूडीज’ या पतमानांकन संस्थेने केलेले अवमूल्यन

मुइज्जू यांच्या भारत भेटीमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळू शकते. मालदीव आता आपल्या ‘वेलकम इंडिया’ (भारताचे स्वागत) या मोहिमेद्वारे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘इंडिया आऊट’ हा प्रचाराचा मुद्दा करून मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले आणि चीनमुळे उन्मत्त झालेले मुइज्जू प्रारंभीचा काही काळ भारताच्या विरोधात होते. याचा लाभ घेऊन चीननेही मालदीवच्या समुद्रात त्यांच्या नौदलाच्या हालचाली वाढवल्या होत्या; परंतु गेल्या ३ मासांत मुइज्जू भारताशी चांगले वागू लागले आहेत.

मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. गतवर्षी आणि त्याच्याही आधी कित्येक वर्षे मालदीवला जाणार्‍या पर्यटकांमध्ये भारतियांची संख्या सर्वाधिक होती. यंदाच्या  वर्षी लक्षद्वीप-मालदीवच्या वादात मोदींवर मालदीवमधून आगपाखड झाली. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मालदीववर बहिष्काराची मोहीम भारतात तीव्र झाली. जवळपास ५० सहस्र भारतीय  पर्यटकांची  घट पहायला मिळाली. याखेरीज कोरोना महामारीच्या पश्चात मालदीवची  अर्थ व्यवस्था अद्याप रूळावर आलेली नाही. ‘मूडीज’ या पतमानांकन संस्थेने मालदीवचे अवमूल्यन केले आहे. ‘ कर्ज ‘ बुडवण्याच्या दिशेने त्या देशाची वाटचाल चालू आहे. केवळ ४४ कोटी  डॉलर्सची परकीय गंगाजळी मालदीवकडे शेष असून पुढील दीड मासच जीवनावश्यक वस्तू, इंधनाची आयात यांसाठीच ती पुरू शकेल’, अशी चेतावणी ‘मूडीज’ने दिली आहे. अशा गंभीर परिस्थितीत मुइज्जू यांनी धावाधाव करणे आवश्यक होते.

४. चीनमुळे मालदीवची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी !

चीनने मालदीवला  आर्थिक  संकटातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य केले नाही. त्यामुळे तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली. भारताने उदार मनाने ४० कोटी डॉलर्सच्या (३ सहस्र ३६० कोटी रुपये) चलनाची अदलाबदल आणि ३ सहस्र कोटी भारतीय रुपयाचे चलन अदलाबदल या स्वरूपात साहाय्य देऊ केले. चीन त्याच्या मित्रदेशांना साहाय्य करत नाही, तर त्याचे साहाय्य हे सावकारी स्वरूपातील असते आणि ते साहाय्य म्हणजे  कर्जाची ची परतफेड ! याचा अर्थ  आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे असते. यासाठीच मुइज्जू यांना भारतभेटीसाठी यावे लागले.

त्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीव भेटीचे साकडे घातले आहे. मालदीव, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये भारतविरोधी भावनांवर स्वार होऊन सत्तापदावर निवडून आलेल्यांना स्वतःच्या आर्थिक कुवतीचे, वर्षानुवर्षांच्या आर्थिक बेशिस्तीची आणि चीनशी मैत्री जोडण्याची किमत कळली आहे. श्रीलंकेला मध्यंतरी भारताने भरीव आर्थिक साहाय्य केले. नेपाळविषयीही आपण सकारात्मक आहोत. आता मुइज्जूंना हे समजले आणि ते भारताचे मित्र बनले.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.