महिला राजकारणात केवळ ‘५ वर्षे पाहुण्या’ हे चित्र आता पालटावे ! – विजया रहाटकर, अध्यक्षा, केंद्रीय महिला आयोग
छत्रपती संभाजीनगर – आरक्षणामुळे महिलांचा राजकारणातील टक्का वाढत आहे; मात्र सध्या ती ५ वर्षांची पाहुणी म्हणून येत आहे. हे चित्र पालटले पाहिजे. महिलांनी स्वत: काम करायला शिकले पाहिजे आणि कुटुंबातील पुरुषांनी त्यांना काम करू देण्याची मानसिकता सिद्ध केली पाहिजे. तेव्हाच महिलांच्या नेतृत्वातील भारत घडू शकतो. त्यासाठी केंद्रीय महिला आयोग काम करणार आहे, असे मत केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे बोलतांना व्यक्त केले. विजया रहाटकर या वर्ष १९९५ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे भाजपची बूथ कार्यकर्ती होत्या.
विजया रहाटकर म्हणाल्या की,
१. प्राचीन भारताचा इतिहास मातृसत्ताक आहे. अनेक राजकर्त्या महिलांनी आपल्या समाजाची पायाभरणी केली आहे. एन्.आर्.ए. मॅरेजेसमधील प्रश्न, सायबर क्षेत्रातील महिलांची सुरक्षा आणि मॅट्रिमोनियल साईट्सवरील महिलांची फसवणूक या विषयांवर प्राधान्याने काम करणार आहे.
२. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा असतांना एन्.आर्.ए. मॅरेजेसमधील अनेक तक्रारी येत होत्या; मात्र त्या देहली कार्यालयाकडे पाठवण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो.
३. त्या वेळी महाराष्ट्राच्या पुढाकाराने देहली येथे तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.
४. त्यानंतर ‘एन्.आर्.ए. मॅरेजेस’चे विधेयक सिद्ध झाले. सध्या हे विधेयक संसदीय समितीपुढे असून ते प्रत्यक्षात यावे, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
केंद्रीय महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे !
‘‘कोणतीही अडचण आल्यास महिला हक्काने माहेरी धाव घेतात. महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे. तेवढ्या विश्वासाने त्या आयोगाकडे आल्या पाहिजेत आणि आयोगाने त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा देशभर उभी करणार आहे’’, असे विजया रहाटकर यांनी सांगितले. |