JNU Cancels Seminars : इराण, पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन या देशांच्‍या भारतातील राजदूतांची ‘जे.एन्.यू.’मधील व्‍याख्‍याने रहित

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील (‘जे.एन्.यू.’तील) (जे.एन्.यू. म्‍हणजे जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय) इराण, पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन या देशांच्‍या भारतातील राजदूतांचे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. यांतील पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन यांच्‍या राजदूतांची व्‍याख्‍याने रहित करण्‍यात आली आहेत, तर इराणचे भारतातील राजदूत डॉ. इराज इलाही यांचे नियोजित व्‍याख्‍यान पुढे ढकलण्‍यात आले आहे. ‘पश्‍चिम आशियातील घडामोडींकडे इराण कसे पाहतो ?’ या विषयावर डॉ. इराज इलाही विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणार होते.

(डावीकडून उजवीकडे) इराणचे राजदूत डॉ. इराज इलाही, लेबेनॉनचे राजदूत डॉ. राबी नार्श, पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अल-हाइजा यांची व्‍याख्‍याने रहित

जे.एन्.यू.च्‍या पश्‍चिम आशिया अभ्‍यास केंद्राकडून ही व्‍याख्‍याने आयोजित करण्‍यात आली होती. ‘अशा व्‍याख्‍यानांमुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये फूट पडून आंदोलने होण्‍याची शक्‍यता असल्‍याने हा कार्यक्रम रहित करण्‍यात आला’, असे सांगण्‍यात आले आहे. याविषयी जे.एन्.यू. ‘स्‍कूल ऑफ इंटरनॅशनल स्‍टडीज’चे अधिष्‍ठाता अमिताभ मट्टू म्‍हणाले की, आपण अशा जगात राहत आहोत जिथे भावना सहज दुखावल्‍या जाऊ शकतात.

पॅलेस्‍टाईनचे राजदूत अदनान अबू अल-हाइजा यांचे ७ नोव्‍हेंबरला आणि लेबेनॉनचे राजदूत डॉ. राबी नार्श यांचे १४ नोव्‍हेंबरला व्‍याख्‍यान होणार होते.  ‘पॅलेस्‍टाईनमधील हिंसाचार’ आणि ‘लेबनॉनमधील परिस्‍थिती’ हे त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांचे विषय होते.

संपादकीय भूमिका

मुळात या देशांच्‍या राजदूतांची व्‍याख्‍याने आयोजितच का करण्‍यात आली होती ? सध्‍या यांतील २ देशांमध्‍ये युद्ध चालू असून तिसरा देश युद्धाच्‍या उंबरठ्यावर आहे. अशांना भारतात सार्वजनिक व्‍यासपीठ मिळाल्‍यास त्‍याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?