Kerala Gold Raid : केरळमध्‍ये ‘जीएस्‌टी’च्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या उत्‍पादकांवर धाडी : १२० किलो सोने जप्‍त ! 

थिरुवनंतपूरम् (केरळ) – राज्‍य वस्‍तू आणि सेवा कराच्‍या त्रिशूरस्‍थित ‘इंटेलिजन्‍स अँड एन्‍फोर्समेंट विंग’ या गुप्‍तचर विभागाने त्रिशूर, केरळमधील सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या उत्‍पादकांवर धाडी घालून १२० किलो बेहिशेबी सोने जप्‍त केले. राज्‍य वस्‍तू आणि सेवा कर विभागातील अनुमाने ७०० अधिकार्‍यांनी ७८ ठिकाणांवर नुकत्‍याच धाडी घातल्‍या. अधिकार्‍यांनी ५ वर्षांच्‍या करचुकवेगिरीचे पुरावे उघड केले आहेत.
ही कारवाई राज्‍य वस्‍तू आणि सेवा कर विभागाच्‍या राज्‍यातील आतापर्यंतच्‍या सर्वांत मोठ्या धाडींपैकी एक आहे.

या धाडीत दागिन्‍यांच्‍या कारखान्‍यांचा शोध घेण्‍यात आला, जिथे सोने वितळवून सिद्ध केले जाते. यासह सुवर्ण व्‍यावसायिकांच्‍या घरांचीही झडती घेण्‍यात आली.


अधिकार्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, अनेक उत्‍पादक कर न भरता सोन्‍याच्‍या व्‍यवहारात गुंतल्‍याचे या वेळी समोर आले. काही मालकांनी करचुकवेगिरी केली आहे. या धाडीत करचुकवेगिरीचे पुरावे सापडल्‍याचे अधिकार्‍यांनी सांगितले.