Vishwaprasanna Theertha Swami : (म्‍हणे) ‘पेजावर स्‍वामींनी भगवे कपडे त्‍यागल्‍यास त्‍यांना धडा शिकवू !’ – बी.के. हरिप्रसाद, कांग्रेसचे आमदार

  • कांग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांची गरळओक

  • स्‍वामीजींनी जातीआधारित जनगणनेच्‍या विरुद्ध केले होते वक्‍तव्‍य !

डावीकडून बी.के. हरिप्रसाद आणि पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी

नवी दिल्ली – जातीआधारित जनगणनेच्‍या विरुद्ध केलेल्‍या विधानांवरून पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी यांच्‍यावर विधान परिषदेचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांनी टीका केली आहे. ते म्‍हणाले की, स्‍वामीजी राजकारण्‍यांसारखे विधान करत आहेत. पेजावर विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी पूर्वी यासंदर्भात (राजकीय विषयांवर) कोणतेही विधान करत नसत. ते वरिष्‍ठ आहेत; मात्र आयोध्‍येत श्रीरामरंदिर उभारल्‍यापासून ते सर्व गोष्‍टींवर विधान करत आहेत. स्‍वामीजी सर्व संगपरित्‍यागी असतात, असे म्‍हटले जाते; परंतु आता स्‍वामीजी बदलले आहेत. जर पेजावर स्‍वामीजी भगवे कपडे त्‍यागून आले, तर त्‍यांना आम्‍ही धडा शिकवू, असे अत्‍यंत खालच्‍या थराला जाऊन हरिप्रसाद यांनी वक्‍तव्‍य केले.

काय म्‍हणाले होते श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी ?

दोन दिवसांपूर्वी शिवमोग्‍गा येथे पत्रकारांशी बोलतांना उडुपीच्‍या पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी म्‍हणाले होते की, निधर्मी राष्‍ट्रात जातीआधारित जनगणनेची आवश्‍यकता का आहे ? जातीआधारित जनगणनेसाठी सरकारने मोठा खर्च केला आहे. एकीकडे ‘जातीआधारित राजकारण करण्‍याची आवश्‍यकता नाही’, असे सांगितले जाते आणि दुसरीकडे ‘अशा जनगणनेची आवश्‍यकता आहे’, असे म्‍हटले जाते. जातीआधारित जनगणनेची आवश्‍यकता का आहे ?, हे समजत नाही.

आमदार हरिप्रसाद यांच्‍या वक्‍तव्‍यावरून ब्राह्मण संघटनांचा विरोध !

बागलकोट – जातीआधारित जनगणनेसंदर्भात अभिप्राय मांडणारे आदरणीय श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी यांच्‍यासंदर्भात हलकी भाषा वापरणारे काँग्रेस नेते बी.के. हरिप्रसाद यांनी त्‍वरित क्षमा मागावी, असा आग्रह ‘अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभा’ आणि ‘ब्राह्मण तरुण संघ’ यांनी धरला आहे. यासंदर्भात त्‍यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ही मागणी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे की, लोकशाहीत सर्वांना समानपणे बोलण्‍याचा अधिकार आहे. जातीआधारित जनगणना संदर्भात स्‍वामीजींनी कुणावरही टीका केलेली नाही. समाजात समानता निर्माण करायची असेल, तर जातींच्‍या आधारावर समाज विभाजित करून त्‍यांचे उदात्तीकरण करणे योग्‍य नाही, हेच त्‍यांचे विधान आहे. हरिप्रसाद यांनी श्रींची त्‍वरित क्षमायाचना करावी अन्‍यथा आम्‍हाला या लढ्यात उतरावे लागेल, असा इशाराही ब्राह्मण संघटनांनी दिला आहे. (श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी हे सबंध हिंदु समाजाचे संत आहेत. त्‍यामुळे केवळ ब्राह्मणांनी नव्‍हे, तर सर्वांनीच त्‍यांना पाठिंबा दिला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पेजावर स्‍वामींच्‍या ऐवजी एखादा मौलाना अथवा मौलवी याने असे वक्‍तव्‍य केले असते, तर आमदार महाशयांनी त्‍यांच्‍यावर टीका तर सोडा; पण लाळघोटेपणा करत त्‍यांचे बोलणे उचलून धरले असते ! हिंदूंच्‍या अतीसहिष्‍णुता या सद़्‍गुणविकृतीचाच हा परिणाम आहे की, कुणीही उठते आणि हिंदूंच्‍या संतांवर चिखलफेक करत सुटते !