‘बीबीसी’वर खटला चालवण्याची वेळ का आली ?
अनेक जण जवळजवळ एक शतक ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ला (‘बीबीसी’ला) निःपक्षपाती पत्रकारितेचा आधारस्तंभ मानतात; परंतु काळजीपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या या प्रतिमेमागे प्रसारमाध्यमांची हेराफेरी, राजकीय पूर्वग्रह आणि वैचारिक विकृती यांचे अस्वस्थ करणारे वास्तव आहे आणि या वास्तवाला बर्याच काळापासून आव्हान दिले गेलेले नाही. ‘जयपूर डायलॉग्स २०२४’मध्ये ‘बीबीसी ऑन ट्रायल’चा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून आम्ही बीबीसीच्या काळ्या बाजूचा आता सामना करत आहोत, जिने (बीबीसीने) जागतिक कथानकांमध्ये भारताला विशेष आणि प्रचंड हानी पोचवली.
लेखक : प्रा. सतीश के. शर्मा, अध्यक्ष, ग्लोबल हिंदु फेडरेशन, लंडन
१. बीबीसी : प्रसारमाध्यम नव्हे, विकृत कथानकाद्वारे समाजाची मोठी हानी करणारे शस्त्र !
‘बीबीसी’चा प्रभाव अनियंत्रितपणे जगाच्या कानाकोपर्यात पोचला आहे. कोट्यवधी लोकांच्या मनात द्वेषाला चालना देणारी कथानके पसरवणे , हिंसाचाराला उत्तेजन देणे आणि समाजात फूट पाडणे ही कामे अत्यंत कुशलतेने करण्याची बीबीसीची क्षमता हीच तिची शक्ती आहे. या शक्तीचा वापर बीबीसीने भारताविरुद्ध त्याचप्रमाणे पूर्वीच्या वसाहती आणि भू राजकारण यांवर कशा पद्धतीने करून तेथे प्रभाव पाडला, याची माहिती ‘बीबीसी ऑन ट्रायल’ या माहितीपटात देण्यात आली आहे. बीबीसी हे आता केवळ एक प्रसारमाध्यम राहिलेले नाही, तर ते एक ‘वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन’ म्हणजे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी करणारे शस्त्र आहे, जे स्वतःच्या विकृत कथानकाद्वारे सर्व देशांना अस्थिर करण्यास पूर्णतः सक्षम आहे.
२. वसाहतवादी मानसिकता अजूनही टिकून ठेवण्यासाठी बीबीसीकडून सातत्याने भारताचे नकारात्मक चित्रण
ब्रिटीश साम्राज्याच्या नियंत्रण करण्याच्या आवश्यकतेतून बीबीसीचा जन्म झाला. वर्ष १९२७ मध्ये शाही सनदेअंतर्गत (‘रॉयल चार्टर’अंतर्गत) बीबीसी चालू झाली. जिचा उद्देश होता, ब्रिटीश साम्राज्याच्या हितसंबंधाला अनुकूल अशा जनसंवादाचे नियमन करणे आणि त्याप्रमाणे जनमताला आकार देणे. आता ब्रिटिशांचे साम्राज्य जरी अधिकृतपणे कोसळले असले, तरी बीबीसीमधील वसाहतवादी मानसिकता अजूनही टिकून आहे. बीबीसीने तिच्या स्थापनेपासून जागतिक स्तरावर पाश्चात्त्यांच्या वर्चस्वाला बळकटी देणार्या कथानकांचा प्रचार करून दक्षिणेतील राष्ट्रांचा आवाज दाबून टाकला आहे. याचे उदाहरण भारताच्या संदर्भातील बीबीसीच्या वृत्तांकनातून वेळोवेळी समोर आले आहे. भारत हा ब्रिटीश साम्राज्याच्या ‘मुकुटातील रत्न’ असल्यापासून बीबीसीने भारतीय उपखंडाविषयीचे केलेले चित्रण पक्षपाती आणि चुकीच्या माहितीने भरलेले आहे. भारताला वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले असले, तरी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये भारताची न्याय्य प्रतिनिधित्वासाठीची लढाई चालूच आहे; कारण बीबीसीने सातत्याने भारताचे नकारात्मक चित्रण केले आहे.
वसाहतवादाचा प्रभाव हा त्याच्या भूतकाळातील अवशेषांपेक्षा अधिक दृढ आहे. भारतासारख्या पूर्वीच्या वसाहतींना सतत प्रतिकूल परिस्थितीत ठेवणार्या सत्तेच्या संरचना कार्यरत ठेवण्यासाठी हेतूपुरस्सरपणे वापरण्यात येणारे ‘बीबीसी’ एक साधन आहे. आम्ही ‘बीबीसी ऑन ट्रायल’मध्ये हाच शोध घेतला की, बीबीसीने सातत्याने भारताच्या सार्वभौमत्वाला न्यून लेखल्याचे दिसून आले आहे. या वृत्तवाहिनीने भारताच्या नेतृत्वाच्या संदर्भातील कथानकांमध्ये अनेकदा फेरफार केले आहेत आणि निःपक्षपातीपणाच्या पडद्याआड भारताच्या सांस्कृतिक अन् आर्थिक कामगिरीकडे कायम दुर्लक्ष केले आहे.
३. भारताविषयीचा पक्षपात आणि हिंदुविरोधी भूमिका
बीबीसीचा भारताविरुद्धचा पक्षपातीपणा केवळ वसाहतवादी भूतकाळापुरता मर्यादित नाही, तर समकालीन भारतीय समस्यांविषयीच्या चित्रणात तो आजही कायम आहे. ‘बीबीसी ऑन ट्रायल’ या माहितीपटात, बीबीसीने पद्धतशीरपणे हिंदुविरोधी, भारतविरोधी ‘अजेंडा’ कसा चालवला, विशेषतः ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदु देशभक्तीचा उदय’, यांविषयीचे अलीकडील वार्तांकन कसे चुकीच्या पद्धतीने केले ? याचा शोध घेण्यात आला आहे. यामुळे सत्याचा विपर्यास करणारा आणि भारताच्या सामाजिक, राजकीय परििस्थतीविषयी जागतिक स्तरावर गैरसमज निर्माण करणारा बीबीसीचा पक्षपातीपणा केवळ हानीकारकच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे.
बीबीसीचा माहितीपट ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (भारत : मोदी प्रश्न) हे या पक्षपातीपणाचे एक ठळक उदाहरण आहे. ‘संशोधनात्मक पत्रकारिते’च्या नावाने प्रसारित झालेला हा माहितीपट म्हणजे भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेतृत्वाला अपकीर्त करण्यासाठी आणि भारतात धार्मिक अन् सांस्कृतिक आधारावर फूट पाडण्यासाठी सिद्ध करण्यात आलेला एक यशस्वी प्रयत्न होता. १३३ उच्चपदस्थ नागरी सेवक, निवृत्त लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी यांच्या समूहाने ‘या माहितीपटाचा साम्राज्यविषयक कल्पनांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे’, असे म्हणून निषेध केला. भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी ब्रिटनने केलेल्या स्वतःच्या वसाहतवादी काळातील अत्याचारांची पडताळणी करून बंगालमधील दुष्काळासारख्या घटनांचे वार्तांकन करून पत्रकारितेला अधिक चांगली सेवा करता यावी, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
४. बीबीसीचे कटु सत्य
बीबीसीच्या अनैतिक पद्धती पक्षपाती बातम्यांच्या पलीकडेही विस्तारलेल्या आहेत. या माहितीपटात बीबीसीच्या उत्पत्तीच्या त्रासदायक पद्धतींचाही समावेश आहे. यामध्ये बीबीसीची अधिक प्रमाणातील अतिरेकी भूमिका आणि असंख्य लैंगिक शोषण घटना झाकण्यात असलेला सहभाग समाविष्ट आहे.
५. ‘बीबीसी ऑन ट्रायल’ माहितीपटाला अनेक देशांतील हिंदूंकडून पाठिंबा
‘बीबीसी ऑन ट्रायल’ हा केवळ माहितीपट नसून ती एक चळवळ आहे. भारत, इंग्लंड, अमेरिका आणि न्यूझीलंड या देशांतील हिंदूंकडून अर्थसाहाय्य मिळालेल्या या माहितीपटातून चुकीच्या माहितीचा सामना करण्याचा आणि सत्याचा शोध घेण्याविषयीचा जागतिक संकल्प प्रतिबिंबित होतो. यासाठी योगदान देणारे कपिल दुदाकिया आणि रुचिर शर्मा हे जनमत अन् धोरण निर्मिती यांवर बीबीसीने केलेल्या कृतींच्या परिणामांविषयी त्यांची अंतर्दृष्टी व्यक्त करतात.‘द जयपूर डायलॉग्स’, ‘स्ट्रिंग जिओ’, ‘प्राच्यम्’ आणि ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’ यांच्या पाठिंब्याने सिद्ध झालेला हा माहितीपट बीबीसीच्या अनियंत्रित शक्तीवर प्रकाश टाकतो आणि ‘अशा पक्षपाती संस्थेला काम करण्याची अनुमती का दिली जावी ?’, असा प्रश्न उपस्थित करतो.
६. बीबीसी विरुद्ध जागतिक चळवळ
विजयादशमीच्या दिवशी या चित्रपटाचा ‘टीझर’ (छोटे चलचित्र) प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या ४८ घंट्यांमध्ये ‘एक्स’वरील ‘ट्रेलर’ला १.३५ दशलक्षांहून अधिक अभिप्राय मिळाले आहेत. यावरून बीबीसीच्या चुका उघड करण्यात किती व्यापक प्रमाणात स्वारस्य आहे ? हे दिसून येते. अशी पक्षपाती संस्था भारतात काम करण्यास लायक आहे का ? असा प्रश्न आपण विचारायला हवा. बीबीसीने खोलवर रुजवलेला साम्राज्यवादी हेतूचा प्रभाव पाडणे चालू ठेवायला हवे कि या संस्थेची अनियंत्रित शक्ती संपवण्याची वेळ आली आहे ?
७. बीबीसीवर भारतात खटला चालवणे आवश्यक
आता बीबीसीला उत्तरदायी ठरवण्याची वेळ आली आहे. बीबीसीचे अधूनमधून प्रसारित होणारे लोकांची दिशाभूल करणारे अहवाल किंवा पक्षपाती माहितीपट यांना विरोध करणे, एवढेच पुरेसे नाही. या संस्थेवरच खटला चालवला गेला पाहिजे. वादविवाद आणि मतभेद यांचा दलाल असेलेल्या बीबीसी या आधुनिक काळातील वृत्तवाहिनीवर (ब्रिटीश साम्राज्याच्या ‘मुकुटातील रत्न’ असलेल्या) भारतामध्ये खटला चालवण्याची खरोखरच वेळ आली आहे.
आवाहनजर तुम्हाला सत्य, न्याय अन् न्याय्य प्रतिनिधीत्वाची काळजी असेल, तर बीबीसीचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठीच्या चळवळीत सहभागी व्हा. ‘@bbcontrial’ आणि ‘@thebritishhindu’ चे अनुकरण करा, ‘ट्रेलर’ मोठ्या प्रमाणात प्रसारित करा आणि ‘#BBCOnTrial’, ‘#BBCMuktBharat’ अन् ‘#DefundtheBBC’ या ‘हॅशटॅग’चा (एखाद्या विषयावर घडवून आणलेली चर्चा) वापर करा. आपण एकत्रितपणे आपले कथानक (सत्य इतिहास आणि वर्तमान) पुन्हा मिळवून बीबीसीच्या चुकीच्या माहितीच्या राजवटीचा अंत करू शकतो. – प्रा. सतीश के. शर्मा |