‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ : हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर !

(टीप : अ. अज्ञेय म्हणजे अजाण, आ. रुद्ध म्हणजे अडकून पडलेले)

‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ ही कविता सावरकर यांनी अंदमानमध्ये असतांना रचलेली कविता आहे. अंदमानातील या कविता त्यांनी ‘विजनवासी’ या नावाने रचल्या. या कवितांना ते ‘रानफुले’ म्हणत असत.  अशाच या रानफुलांमध्ये हे कुठूनसे आलेले हे ब्रह्मकमळ ! २४ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर घडले कसे ?, परब्रह्माचे द्वार, मुक्तीचे द्वार; पण हे द्वार अजूनही रुद्ध झाल्यासारखे; योगमार्गाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतीच्या मार्गावर असतांना झालेली स्थिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/847583.html

स्वातंत्र्यवीर सावरकर

७. क्रांतीकार्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मृत्यूविषयीचे विचार

आदित्य शेंडे

सोडुनी गलबला सारा एकान्त पथा मग धरिला
देताति तारका ज्याला
ओसाडशा उजेडाला
चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे ।
अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ।। ६ ।।

जरि राजमार्ग जे मोठे
तुझियाचि घराचे ते ते घर अन्य असेलच कोठे
या अरुंद आळीतुन तें मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे ।
हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ।। ७ ।।

‘आता मात्र येथून पुढचा मार्ग हा माझा एकट्याचा,’ असे उद्गार तात्याराव काढतात. आता मृत्यूला प्रथम मी तोंड देणार ! पुढे म्हातारपणी या आठवणीविषयी ‘आत्महत्या आणि आत्मर्पण’, या लेखात तात्याराव तरुणपणी आपण मृत्यूला ‘ये तू कोण भीतो तुला !’ अशा प्रकारे आव्हान दिले, त्याच मृत्यूला आता रितसर बोलावणे पाठवण्याची वेळ आली आहे’, अशा आशयाचे उद्गार काढतांना दिसतात. ‘हा पथ स्मशानी जसा शिराला, तेव्हाच सारा गलबला सोडून मी एकांत स्वीकारला’, असे सावरकर म्हणत आहेत. आपल्यामुळे कुणा दुसर्‍याला का यातना भोगाव्या लागाव्या ?, या विचाराशी ते कासावीस होऊन एकटे पुढे गेले आणि हो, अनेक राजमार्गही आहेत !  असतीलही ! पण ‘ते मार्ग ‘वक्रचेतस्’, म्हणजे कूटनीतीत बसतात. सदाशिवापाशी ज्यांना जायचे आहे, ते ‘अवक्रचेतस्’, म्हणजेच सरळमार्गी असतात’, अशी ‘कठोपनिषदा’ची आज्ञा आहे. या राष्ट्रयज्ञात त्यांच्या जागी दुसर्‍या कुणालाही त्यांनी यातना सोसण्यास उभे केले असते आणि स्वतः स्वतंत्र राहून कार्य केले असते. तरी अनेक जण ‘मी मी’ म्हणत त्यांच्यासाठी फासावर गेले असते ! आणि ते वरवरच्या राष्ट्रीय कर्माशयात चालतेही ! पण मनाच्या गाभार्‍याला अशा विचारांचा विटाळ होतो. आमचे सावरकर खरोखरीच साधे होते हो ! फार साधे ! हे असे निर्णय कुठल्या बळावर होतात माहिती आहे ? याला अध्यात्मात ‘क्रियाफलआश्रयत्व’ असे म्हटले आहे. सतत सत्याचरण जो करतो, अशा व्यक्तीच्या आश्रयाला कर्माची फळेही येत असतात. तीही त्याच्यापुढे नमतात ! मृत्यूला अशी व्यक्ती भीत नाही ! असे लोक भीतीशून्य झालेले असतात. अशा घनरात्रीच्या दुर्गम मार्गांवर काही तार्‍यांच्या ओसाड अशा प्रकाशांचीच काय ती त्यांना संगत ! अशांचे मार्ग अरुंदच असायचे ! जणू काही अणूंच्या बोगद्यातून जात आहे, असे वाटावे इतके ! आणि अंती हे ते नित्याचे घर ! तेच ते रुद्ध द्वार ! परत यायचे नाही; म्हणून गेलो खरा; पण पुन्हा त्याच द्वाराशी नियती घेऊन आली ! जे व्हायचे तेच झाले !

८. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य राखणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

घर दुजे बांधु देईना आपुले कुणा उघडीना !
या यत्न असा चालेना बसवे न सोडुनी
यत्ना ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बारे ।
तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे ।। ८ ।।

विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी रचून असेच काहीसे आपले दुजे (दुसरे) घर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, थेट सदाशिवांना (भगवान शिव यांना) आव्हान देऊन ! पण त्यांना पुढे जसे नियतीचे मर्म समजले तसे तेही ‘न ता मिनन्ति मायिनो न धीरा व्रता देवानां प्रथमा ध्रुवाणी (ऋग्वेद)’, असे उद्गार काढते झाले ! की अगदी मायावी मनुष्य सुद्धा मुळात देवांची जी काही स्थिर, अढळ ध्रुव अशी व्रते आहेत ती मोडत नाही ! इथे सावरकर हेच म्हणतांना दिसत आहेत; पण खरोखरच नियतीच्या अशा पदांना आणि दैवाच्या गतीला आव्हान देण्याचा मोह देवपुरुषांना व्हायचाच ! हे दार ठोठावण्याचा यत्न काही मोठा चालत नाही; पण प्रयत्न केल्यावाचून चैनही पडत नाही, अशी ही द्वंद्वाची स्थिती ! सावरकर यांनी अंदमानात अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धृती (धैर्य) भंगू दिली नाही ! नियतीने अनेक भोग माथी लादले; पण त्यातही ते आयुष्यभर इतरांचाच विचार करत राहिले ! स्वतःचा विचार त्यांना कधी शिवला नाही ! ‘खरोखरच त्यांनी सोसलेल्या सगळ्या यातना पाहिल्या आणि एकीकडे त्यांनी त्या प्रतिकूलतेतूनही फुलवलेला स्वर्ग पाहिला की, खरोखरीच दुजे घर बांधण्यात ते यशस्वी झाले असावेत’, असे क्षणभर मनाला वाटून जाते ! वाचकहो, आपल्या आयुष्यात अशी पुण्याई केव्हा हो येणार ? ‘दुजं द्वार’ ही तर पुढची गोष्ट; पण आपल्याला हे कर्मगतीचे द्वार, हे मोक्षद्वार तरी पूर्णार्थाने ठाऊक आहे का हो ? तो अज्ञेय असा शंकर आपणा सर्वांना अशा जीवनमुक्त श्रेष्ठांच्या मार्गावर अग्रेसर करो, हीच त्याच्याकडे प्रार्थना करतो !

(समाप्त)

– श्री. आदित्य शेंडे, पुणे.