साधिकेला तिच्या वडिलांच्या निधनानंतरही घर रिकामे न वाटता एक प्रकारचा आधार वाटणारे अस्तित्व सतत जाणवण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. नेहा प्रभु (कै. किशोर घाटे यांची मुलगी) : माझे वडील किशोर घाटे (वय ७५ वर्षे) यांचे २२.९.२०२४ या दिवशी निधन झाले. त्यानंतर त्यांचे मृत्यूत्तर विधी पूर्ण झाल्यावर सर्व पाहुणे त्यांच्या गावी गेले, तरीही घर रिकामे न वाटता तेथे एक प्रकारचा आधार वाटणारे अस्तित्व सतत जाणवत आहे. हे घरातील आम्हा सर्वांनाच जाणवले. यामागचे नेमके कारण काय ? असे कशामुळे वाटत आहे ?

कै. किशोर घाटे

२. उत्तर

२ अ. कुलदेवी श्री महालसा नारायणी हिने घाटेकाकांचा लिंगदेह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित केल्याने काकांच्या लिंगदेहाला सद्गती मिळणे : ‘कै. किशोर घाटेकाका यांची कुलदेवी श्री महालसा नारायणी हिच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. त्याचप्रमाणे त्यांच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ आदरभाव होता. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या आधी श्री महालसा नारायणी हिने काकांचा लिंगदेह सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी समर्पित केला. हा ज्योतीच्या स्वरूपातील लिंगदेह सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांच्या ओंजळीत घेतल्यामुळे काकांच्या लिंगदेहाला सद्गती मिळाली. त्यामुळे त्यांची कोणतीही इच्छा अतृप्त राहिली नाही आणि त्यांना उच्च स्वर्गलोकात स्थान मिळाले. परिणामी घरातील त्यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी उच्च स्वर्गलोकातील सात्त्विकता निर्माण झाली.

२ आ. घाटेकाकांच्या पितरांना काकांच्या मृत्यूत्तर विधींतील सात्त्विकता आणि चैतन्य मिळाल्याने त्यांना सद्गती प्राप्त

सौ. नेहा प्रभु

होऊन त्यांनी आशीर्वाद देणे : घाटेकाकांचे निधन पितृपक्षात झाल्यामुळे या कालावधीत त्यांच्या कुटुंबियांच्या जवळ आलेल्या अतृप्त पितरांना श्री दत्तगुरूंनी शांत करून तृप्त केले. घाटेकाकांचे ‘त्रिपाद शांत, उदक शांत’ यांसारखे सर्व मृत्यूत्तर विधी श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी अतिशय भावपूर्णरित्या केले. त्यामुळे या विधींतील चैतन्य ग्रहण करण्यासाठी घाटे कुटुंबियांच्या घरात त्यांचे सात्त्विक पितर उपस्थित होते. या पितरांना मृत्यूत्तर विधींतील सात्त्विकता आणि चैतन्य मिळाल्याने त्यांना सद्गती प्राप्त झाल्याने ते प्रसन्न होते. त्यांनी ‘संपूर्ण घाटे कुळाचा उत्कर्ष होऊ दे’, असा आशीर्वाद दिला. त्यामुळे घरात दुःखद वातावरण न जाणवता आल्हाददायक वातावरण जाणवत होते.

२ इ. श्री गणेशाकडून मंगलदायी शक्तीचे प्रक्षेपण झाल्याने घाटे कुटुंबीय आणि त्यांची वास्तू यांभोवती अभेद्य संरक्षककवच निर्माण झालेले असणे : घाटे कुटुंबीय हे श्री गणेशाचे उपासक आहेत. त्यामुळे घाटेकाकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विघ्नहर्त्या श्री गणेशाने त्याच्या कृपाछत्राखाली घेतले आहे. श्री गणेशाकडून शुभ आणि मंगलदायी शक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे घाटे कुटुंबीय अन् त्यांची वास्तू यांच्या भोवती अभेद्य संरक्षककवच निर्माण झाले आहे.

सारांश : घाटे कुटुंबावर गुरुतत्त्वासह अन्य देवतांचे कृपाशीर्वाद आहेत. त्यामुळे श्री गुरूंसह देवतांचे कृपाशीर्वाद मिळाल्याने भगवंतानेच त्यांना आध्यात्मिक स्तरावरील आधार दिला आहे. परिणामी घाटेकाकांच्या निधनानंतरही त्यांच्या घरात दुःखद वातावरण न जाणवता एक प्रकारचा आधार वाटणारे अस्तित्व सतत जाणवत आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : १५.१०.२०२४, सकाळी ९.३० ते १०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक