गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीला सामोरे जाणार्या पाचल (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील कै. (श्रीमती) ज्योती प्रकाश चिंचळकर !
‘२०.१.२०२४ या दिवशी माझ्या आईचे (ज्योती प्रकाश चिंचळकर (वय ५८ वर्षे) यांचे) निधन झाले. माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती
आईला नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. ती सेवेनिमित्त सामाजिक प्रसार (सोशल मीडिया) माध्यमातून प्रचार करणे, ट्विट करणे आदी गोष्टी शिकली. ती शाळेत शिक्षिका असतांना भ्रमणभाष आणि संगणक यांच्याशी संबंधित तांत्रिक गोष्टी शिकली. ती माझ्यापेक्षाही उत्तम प्रकारे संगणक हाताळत असे. मला काही अडल्यास मी तिला विचारत असे.
२. भाषा शिकवण्यातील कौशल्य
ती शाळेत मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषा शिकवत होती. तिने संस्कृतची पदवी घेतली नव्हती, तरीही तिने तो विषय विद्यार्थ्यांना अनेक वर्षे उत्तम प्रकारे शिकवला. ‘तिला देवभाषा शिकवण्याचे भाग्य लाभले’, याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करत असे.
३. कृतज्ञताभाव
आईला श्री ओझर येथील गणपति मंदिराच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ मिळाला. त्याबद्दल तिच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव होता. तेव्हा तिने तो पुरस्कार ग्रामदेवता आणि गुरु यांच्या चरणी अर्पण केला.
४. गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीला सामोरे जाणे
आईला कामाच्या ठिकाणी म्हणजे शाळेत प्रचंड त्रास होत होता. तिच्या ठिकाणी समाजातील अन्य कुणी असते, तर त्यांनी बहुतेक टोकाचे पाऊल उचलले असते. आई मात्र केवळ गुरूंप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तग धरून राहिली. ती कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी नामजपादी उपाय आणि प्रार्थना करत असे. परिणामी समोरच्या व्यक्तीने आईशी शांतपणे बोलणे, तिने आईचे काम करून देणे आणि आईची अडवणूक न करणे इत्यादी अनुभूती आईला येत असत. यामुळे आईमधील शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव यांत वृद्धी झाली होती.
५. मुलीला साधनेत साहाय्य करणे
माझ्या साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर मला आईचे साहाय्य लाभले. तिने माझा मानसिक आणि अध्यात्मिक त्रास समजून घेतला. त्यामुळेच मी साधनेत टिकून आहे. तिने माझ्या साधनेतील प्रत्येक निर्णय पूर्णपणे स्वीकारला. त्यावर तिने कधी प्रतिप्रश्न किंवा शंका उपस्थित केली नाही. मी सेवा किंवा शिबिर यांनिमित्त बाहेर गेल्यावर तिने मला कधी भ्रमणभाष केला नाही. ‘माझ्या सेवेत व्यत्यय यायला नको’, असे तिला वाटत असे.
६. चुकांविषयी संवेदनशील
आईच्या चूक लक्षात आल्यावर ती लगेच कान पकडून आणि हात जोडून क्षमायाचना करत असे. तिने शेवटच्या आजारपणाही हात जोडून क्षमायाचना केली.
७. ती २ घंटे सलग आणि एकाग्रतेने नामजप करत असे. ती रुग्णाईत असतांना आणि तिला वेदना असह्य होत असतांना ‘गुरुदेव, गुरुदेव’ असा जप करत असे.
८. गुरूंप्रतीचा भाव
तिने आपत्काळात तरून जाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता गुर्वाज्ञा म्हणून केली होती. ती ‘वनस्पतींची लागवड आणि आयुर्वेदिय औषधे’ यांविषयीच्या ग्रंथांचे वाचन करून त्यातील सूत्रे लिहून ठेवत असे. तिची ‘आपण पूर्वसिद्धता केली, म्हणजे आपण पूर्णपणे सुरक्षित राहू, आपल्याला काहीच त्रास होणार नाही’, अशी अपेक्षा नव्हती, तर ‘ते आपले प्रारब्ध आणि आपली साधना यांवर अवलंबून असणार आहे’, हे तिला स्पष्ट होते.’
– कु. दीप्ती प्रकाश चिंचळकर (धाकटी मुलगी), पाचल, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी (३.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |