Terrorist attack in Ankara (Turkey) : अंकारा (तुर्कीये) येथे आतंकवादी आक्रमण : १० जण ठार

तुर्कीयेकडून प्रत्‍युत्तरादाखल इराक आणि सीरिया देशांतील कुर्दिश बंडखोरांच्‍या ३० ठिकाणांवर आक्रमण

आतंकवाद्यांनी ‘तुर्की एरोस्‍पेस इंडस्‍ट्रीज’च्‍या मुख्‍यालयावर केलेला हल्ला

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेची राजधानी अंकारा येथे २३ ऑक्‍टोबरच्‍या रात्री आतंकवादी आक्रमण करण्‍यात आले. २ आतंकवाद्यांनी ‘तुर्की एरोस्‍पेस इंडस्‍ट्रीज’च्‍या मुख्‍यालयाला लक्ष्य केले. या ठिकाणी बाँबस्‍फोट, तसेच गोळीबारही करण्‍यात आला. यात १० जणांचा मृत्‍यू झाला, तर १४ जण घायाळ झाले. तुर्कीयेचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी ही माहिती दिली. मृतांचा आकडा आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. अद्याप कोणत्‍याही संघटनेने या आक्रमणाचे दायित्‍व स्‍वीकारलेले नसले, तरी तुर्कीयेने या आक्रमणाच्‍या काही घंट्यांनंतर उत्तर इराक आणि सीरिया या देशांधील ‘कुर्दिस्‍तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या कुर्दिश बंडखोरांच्‍या संघटनेच्‍या ठिकाणांना लक्ष्य केले. जवळपास ३० ठिकाणांवर हवाई आक्रमण करण्‍यात आले. तुर्कीयेच्‍या या आक्रमणानंतर अद्याप पीकेकेकडून अधिकृत प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्‍यात आलेली नाही.

‘नाटो’चे (‘नाटो’ म्‍हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) सरचिटणीस मार्क रूट यांनी या आक्रमणाचा निषेध केला. ते म्‍हणाले की, तुर्कीयेवर झालेले आक्रमण गंभीर आहे. आम्‍ही तुर्कीये समवेत आहोत. या घटनेवर आम्‍ही लक्ष ठेवून आहोत.

संपादकीय भूमिका

इस्‍लामी देशांवर जेव्‍हा आतंकवादी आक्रमण होते, तेव्‍हा ते लगेचच संबंधित आतंकवाद्यांच्‍या ठिकाणांवर अन्‍य देशांतील ठिकाणांवर आक्रमण करतात; मग भारत पाकिस्‍तानवर असे आक्रमण का करत नाही ?