लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण पोलिसांच्या कह्यात !
मुंबई पोलिसांकडून पुणे येथील कर्वेनगर भागात कारवाई !
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुणे येथील कर्वेनगर भागात रचल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक केली आहे. त्याचा भाऊ शुभम पसार झाला असून त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी २३ ऑक्टोबरला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंह यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात दुग्धालय चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाजमाध्यमांतून बिष्णोई टोळीतील सराईतांच्या संपर्कात होते. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते.
बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, तसेच शंकरशेठ रस्त्यावरील एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकावण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघड आला. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.